मुंबई । राज्याचे वर्षभराचे नियोजन असलेल्या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा होऊन त्याबाबतचे निर्णय सभागृहात घेण्यात येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून जरी सभागृह कामकाजाची कार्यक्रमपत्रिका तयार असली, कामकाज सुरु असले तरी सदस्यांचा सूचना आणि विधेयके मांडताना गोंधळ होत असलेले चित्र पाहायला मिळत आहे.
सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी दोघांकडून वेळोवेळी कार्यक्रम पत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे सूचना, लक्षवेधी आणि औचित्याचे मुद्दे मांडण्यात येतात. त्याची एक प्रत सभापती, उपसभापती, तालिका सभापती जे उपस्थित असतील त्यांच्याकडे उपलब्ध असते, तर दुसरी प्रत ही सभागृह सदस्याकडे असते. त्यामुळे सदस्य आणि सभापती आणि एकूणच सभागृह कामकाजात एकसूत्रता राहून गोंधळ उडत नाही. मात्र, गेल्या 2-3 दिवसांपासून या सार्याच्या क्रमामध्ये गोंधळ उडालेला दिसत आहे.
काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी अखेर सभागृहाच्या कार्यक्रम पत्रिकेतील या गोंधळावर बोट ठेवत ते सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. कामकाज कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे निर्विघ्नपणे चालावे, यासाठी विरोधी पक्षांसोबत सरकारनेही संपूर्ण सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे विषय आणि सूचना घेण्यात याव्यात आणि त्याप्रमाणे काही बदल असल्यास ते सगळ्याच सभागृह सदस्यांना आधी कळवाव्यात, अशी सूचना त्यांनी केली. यामुळे सभागृहातील बदललेल्या विषयांवर योग्य तयारी करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सभागृहाच्या वेळेचा होतोय अपव्यय
सभापतींकडून पुकारण्यात येणारे सदस्य आणि त्यांची सूचना व सदस्याकडून मांडण्यात येणारी सूचना किंवा लक्षवेधी यात फरक दिसून आला आहे. यामुळे त्यावेळी ती सूचना किंवा लक्षवेधी बाजूला ठेवून संबंधित प्रश्न बाजूला ठेवून पुढील कार्यक्रम रेकॉर्डवर घेण्यात येतो. यामुळे केवळ सदस्य आणि सभागृहाचा गोंधळाच उडत नाही, तर सभागृहाचा वेळही वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
कामकाज चालत असताना ते कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे चालायला पाहिजे. त्यात जर काही बदल झालाच, तर त्याची माहिती सत्ताधार्यांप्रमाणे विरोधकांनाही असायला हवी. यामुळे सभागृहाचा वेळ वाया जाणार नाही आणि संबंधित विषयावरील चर्चा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
– शरद रणपिसे, काँग्रेस गटनेते, विधान परिषद.