मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या सात डिसेंबरला पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीसाठी राज्य मंत्रिमंडळात जाण्यासाठी उत्सुक असलेले राणे ही निवडणूक कशी जिंकतात, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. कारण ही निवडणूक जिंकण्यासाठी राणेंना 10 अतिरीक्त मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे राणेंना ही निवडणूक जिंकतांना शिवसेनेच्या विरोधाची झळ बसणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 20 नोव्हेंबरला याची अधिसूचना जारी करण्यात येणार असून 29 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गुरूवारी सात डिसेंबरला सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.
राणेंसाठी पुन्हा कसोटीचा काळ
विधानसभेतल्या सदस्यांमार्फत या जागेसाठी मतदान होणार आहे. काँग्रेसला रामराम ठोकताना नारायण राणे यांनी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधानसभेत भारतीय जनता पार्टीचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41, शेतकरी कामगार पक्षाचे तीन, बहुजन विकास आघाडीचे तीन, एमआयएमचे दोन, अपक्ष सात, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. ही जागा जिंकण्यासाठी राणे यांना 145 मते मिळवावी लागतील. भाजपा व भाजपा मित्रपक्षाची 135 मते राणे यांना सहज पडतील. पण, पुढची 10 मते ते कसे मिळवतात याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.