परिस्थितीवर मात करत मॅरेथॉनमध्ये सहभाग

0

मुंबई । कोणत्याही परिस्थितीतून मात करत ध्येय गाठणं हे कधीच सोपे नसते. याचाच अनुभव शिबानी गुलाटीच्या जगण्यातून येतो. यावर्षी 20 ऑगस्ट रोजी बीकेसी येथे होणार्‍या आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये शिबानी गुलाटीचा सहभाग आहे. 2010 मध्ये किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आयुष्याला कोणतीही दिशा नव्हती. मात्र केवळ मानसिक बळ आणि आपणही काहीतरी करू शकतो आणि अवयवदान किती महत्त्वाचे आहे हे लोकांना जाणून देण्यासाठी शिबानीने 2012 पासून पहिले 3 किमी मॅरेथॉन पूर्ण करायचे ठरवले.

धावणे ही एक प्रकारची ध्यानधारणा
आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये शिबानीसारखीच दुसरी कणखर स्त्री म्हणजे सयुरी दळवी. एका ऑटिस्टिक मुलाची आई म्हणून एकट्याने जबाबदारी निभावताना होणारी दमछाक खरेतर फारच त्रासदायक. मात्र मॅरेथॉनमध्ये धावणे सुरु केल्यानंतर आपल्या जीवनात खूपच फरक पडल्याचे सयुरीचे म्हणणे आहे. धावणे हे माझ्यासाठी स्वतःचे वेगळे जग आणि आनंद आहे असेही तिने पुढे सांगितले. धावल्यानंतर सगळ्या काळजी, चिंता विसरून वेगळं समाधान तर मिळतंच पण धावणे हे एक प्रकारची ध्यानधारणा आहे.

आजारावर केली मात
मॅरेथॉनमध्ये अंध अमरजित हेदेखील सहभागी होत आहेत. अमरजित हे जन्मापासून अंध नव्हते मात्र वयाच्या 13 व्या वर्षी त्यांना डोळ्यांचा असाध्य रोग जडला. 32 व्या वर्षापर्यंत त्यांच्या डोळ्यावर उपचार चालू होते. मात्र त्यानंतर त्यांना पूर्ण अंधत्व आले. याशिवाय सर्वात वयस्कर धावपटू म्हणून 77 वर्षीय खुशरू पटेल यादेखील सहभागी होणार आहेत.