जळगाव। आम्ही समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून आमच्या महाविद्यालयाने नेट/सेट या परीक्षेची कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेतून आपला या परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक विकसित होऊ याबरोबरच परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज आहे, असे मत मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी कला विद्याशाखेच्या वतीने आयोजित केलेल्या नेट/सेट कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले. येत्या वर्षी सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
तज्ज्ञ प्राध्यापकाचे मार्गदर्शन
नेट/सेट कार्यशाळेत मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी या कार्यशाळेचा आढावा सादर केला. उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा नि:शुल्क होती. खानदेशातील तीनही जिल्ह्यातील 100 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकानी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, अर्थशास्त्र या विषयांचे नेट/ सेटच्या द्वितीय व तृतीय पेपरचे मार्गदर्शन तज्ज्ञ प्राध्यापकांनी केले. मार्गदर्शनासाठी बाहेरील महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
विद्यार्थ्यांचा केला सत्कार
कार्यशाळेत कला विद्याशाखेतून महाविद्यालयातून तृतीय वर्ष व एम.ए या वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सुरेश तायडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना भावी परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विषयांकडे व्यापक दृष्टीकोनातून पहा. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च पदावर जा असेही ते म्हणाले. व्यासपीठावर कला विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. एन.व्ही. भारंबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय लोहार व आभारप्रदर्शन प्रा. मनोज महाजन यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील कला विद्याशाखेचे बहुसंख्य प्राध्यापक व कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी उपस्थित होते.