परीक्षा देऊनही गुणपत्रिकेवर गैरहजर

0

पुणे । परीक्षेला हजर असणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गैरहजर असल्याचा उल्लेख केल्यामुळे एम.आय.टी महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी शाखेच्या 11 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची निर्माण झाली आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण केंद्र मात्र याबाबत चालढकल करीत असल्याचे दिसून येते.

अभियांत्रिक शाखेच्या मोबाईल कॉम्प्युटिंग या विषयाच्या अंतर्गत आणि बाह्य परिक्षेला उपस्थित राहूनही 11 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुउपस्थित शेरा देण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला निवेदन दिले होते. महाविद्यालयानेही हे विद्यार्थी परिक्षेस उपस्थित होते व महाविद्यालयाकडून त्यांना गुण देण्यात आल्याचे विद्यापीठाला 13 जुलै रोजी पत्राद्वारे कळवले होते. पत्र मिळाल्याचे 17 जुलै रोजी महाविद्यालयाला सांगण्यात आले. मात्र तरीही अद्याप विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका देण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळत नसून नोकरी मिळण्यासही अनेक अडचणी येत आहेत.

याबाबत विद्यापीठाला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आम्ही आत्तापर्यंत 4 ते 5 वेळा परिक्षा विभागातील अधिकार्‍यांकडे विचारणा केली. मात्र अद्याप आम्हाला सुधारीत गुणपत्रिका देण्यात आली नाही, असे अनिकेत इंगोले या विद्यार्थ्याने सांगितले. जनता दल युनायटेडच्या प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर यांनी कुलगुरुंना याबाबतचे निवेदन दिले.