परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळेंना 3 महिन्यांची मुदतवाढ

0

मुंबई । मुंबई विद्यापीठाचा एकूणच कारभार पुढील काही महिने बाहेरील शिक्षणसंस्थांमधील ‘प्रभारी’ अधिकार्‍यांकडून हाकला जात असताना आता त्यांच्याच मुदतीत वाढ करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटूळे यांना अखेर मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदतवाढ 3 महिन्यांची असून आता पुढचे 3 महिने तेच मुंबई विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहणार आहेत. परीक्षा संचालक वसावे यांच्या जागी घाटुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ऑनलाइन मूल्यांकनाच्या आततायी निर्णयामुळे कला, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, विधि आदी महत्त्वाच्या शाखांमधील निकाल प्रलंबित आहेत. मुंबई विद्यापीठाच्या ‘परीक्षा व मूल्यमापन मंडळा’च्या संचालक पदावरून दीपक वसावे यांना हटवून त्यांच्या जागी नाशिकच्या ’यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’चे परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

घोळ निस्तरण्यासाठी घाटुळेंची निवड
दीपक वसावे यांच्यानंतर अर्जुन घाटुळे यांच्याकडे तीन महिन्यांकरिता परीक्षा मंडळाच्या संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ऑनलाइन मूल्यांकनामुळे झालेला घोळ निस्तरण्याचे काम प्रामुख्याने घाटुळे यांना करावे लागणार होते. अजूनही तांत्रिक घोळामुळे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रलंबित आहे. हा गोंधळ निस्तरण्याचे आव्हान घाटुळे यांच्यासमोर होते.

प्रभारी नियंत्रक आणखी किती दिवस?
यापुढील परीक्षाही ऑनलाईन असेसमेंट पद्धतीनेच होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाईन मूल्यांकनाचा अनुभव अर्जुन घाटूळे यांच्या गाठीशी आहे. तसेच मुंबई विद्यापीठातील निकालाचा गोंधळ त्यांच्याकडून बर्‍यापैकी सावरण्यात आला आहे. त्यामुळे यापुढेही त्याचा मुंबई विद्यापीठाला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. अर्जुन घाटूळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार हे पद परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक असे असणार तसचे नव्या कायद्यानुसार ही नियुक्ती करावी लागणार आहे. मात्र अद्याप राज्य सरकारतर्फे या कायद्याची नियमावली जाहीर न केल्याने विद्यापीठाने या पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया पुढे ढकलून प्रभारी नियुक्ती केली आहे.