पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या वाणिज्य परीक्षांच्या निकालात मोठा घोळ झाला असल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली असून, या प्रकारास पुणेस्थित परीक्षा परिषदेचे कार्यालय जबाबदार असल्याची माहिती समोर आली आहे. हा तांत्रिक घोळ मिटविण्यात अद्याप तरी परीक्षा परिषदेला यश आलेले नाही. याबाबतच्या तक्रारी परीक्षार्थ्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केल्या आहेत. लवकरच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊ, अशी माहिती ना. तावडे यांनी दिली.
अर्ध्यापेक्षाअधिक परीक्षार्थ्यांचे निकाल राखीव
राज्य परीक्षा मंडळाच्यावतीने ऑगस्ट 2017 मध्ये घेण्यात आलेल्या लघुलेखन (शॉर्टहॅण्ड) परीक्षेचा निकाल मंडळाने 26 ऑक्टोबररोजी जाहीर केला आहे. परंतु, हा निकाल परीक्षार्थी पाहाण्यास गेले असता, तो रिझर्व्ह (राखीव) असल्याचे प्रत्येकाला दिसून आले. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी पुणेस्थित परीक्षा परिषदेच्या कार्यालयात संपर्क केला असता, तांत्रिक अडचणी असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतरही राज्यभरातून संपर्क होत असल्यानंतर प्री-कंडिशन पूर्तीअभावी निकाल राखीव असल्याचे सांगण्यात आले. आता बहुतांश विद्यार्थ्यांनी प्री-कंडिशन पूर्ण केल्या असता अद्यापही त्यांचे निकाल जाहीर केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यभर परीक्षार्थ्यांमध्ये संतापाची एकच लाट उसळलेली आहे. नेमके किती विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत, याची माहितीही परीक्षा परिषदेकडून दिली जात नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. मुंबई विद्यापीठाच्या निकालाप्रमाणेच या परीक्षांच्या निकालातही मोठा घोळ असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे.
प्री-कंडिशन्सचा घोळ आताच का?
वास्तविक पाहाता, प्री-कंडिशन्स पूर्ण केल्याशिवाय परीक्षा मंडळ कोणत्याच परीक्षेला बसू देण्याची परवानगी देत नाही, अशी माहिती परीक्षार्थ्यांनी दिलेली आहे. तरीही निकाल राखीव झाल्याचे कळताच परीक्षार्थ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित संस्थांकडे दाखल करून ती ऑनलाईन जमाही केले आहेत. तरीही या परीक्षार्थ्यांचा निकाल मंडळाने राखीव ठेवलेला आहे. त्यामुळे निकाल लावण्यात परीक्षा मंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त परीक्षार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले गेले असून, त्यामुळे मंडळाने निकाल वेळेवर लावण्याचा दिखावा का केला? असा संतप्त सवाल परीक्षार्थी करत आहेत.
मंडळ म्हणते केवळ 1400 निकाल राखीव
परीक्षा मंडळात सद्या सावळा गोंधळ सुरु असून, अनेक परीक्षांच्या निकालातून हा गोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे. लघुलेखन परीक्षेसाठी पूर्वअटी पूर्ण केल्यानंतरच परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड मिळते. तरीही पूर्वअटी पूर्ण नाहीत म्हणून निकाल राखीव ठेवले गेले आहेत. महामंडळाचे अधिकारी माळी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी 1400 निकाल सद्या राखीव असल्याचे सांगून, पूर्वअटी पूर्ण झाल्या की तेदेखील लावले जातील, असे सांगितले. तुम्ही परीक्षेला बसू देण्यापूर्वीच पूर्वअटी का पूर्ण करून घेत नाहीत? अशी विचारणा केली असता ते निरुत्तर झाले. परीक्षा मंडळात मोठी तांत्रिक चूक झालेली असून, त्यामुळे हे निकाल राखीव असल्याची माहिती मंडळातील सूत्राने दिली. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली असून, त्यांनी चौकशीचे आश्वासन परीक्षार्थींनी दिलेले आहे.