मैफल प्रकाशनतर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन ; राज्यभरातून साहित्यिकांची मांदियाळी
भुसावळ- कलाकृतीच्या निर्मितीसाठी आतून शब्द यायला हवेत. वाचकांपर्यंत दमदार साहित्य पोहोचण्यासाठी परीवर्तनशील ऊर्जा देणारी कलाकृती असल्यास ती वाचकांना आनंद देणारी ठरते, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे अधिव्याख्याता प्रा.शैलेश पाटील यांनी येथे केले. भुसावळ येथील काशिनाथ भारंबे यांच्या निवासस्थानी असलेल्या मैफल सभागृहात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील होते. गजमल पाटील लिखीत ‘उजास’ या हिंदी कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रा. शैलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मैफल प्रकाशनचे निर्मोही काशिनाथ भारंबे संपादित अक्षरबाग या 21 कवींच्या 194 कवितांचा प्रतिनिधिक काव्यसंग्रह पुणे येथील कवयित्री मानसी चिटणीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर मैफल सर्वांची सर्वांसाठी दिवाळी अंक 2018 चे प्रकाशन प्राचार्य शिवाजी साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात प्रकाशक काशिनाथ भारंबे यांनी तीनही पुस्तकांच्या प्रकाशनाचा आढावा घेऊन त्यामधील साहित्यिकांचे कौतुक केले. प्रा. शैलेश पाटील यांनी गजमल पाटील यांच्या उजास कवितासंग्रहातील कवितांचे सादरीकरण करून त्यातील विचार सांगितला. चिंता सोडून चिंतन करा अशा आशयाच्या अनेक कवितांमधील ओळी सादर केल्या.
वाचकांसह समीक्षकही घेतात कलाकृतींचा आनंद -डॉ.पाटील
अध्यक्षीय मनोगतात डॉ. जगदीश पाटील यांनी साहित्य निर्मितीचा हेतू सांगून साहित्य हे जसे साहित्यिकाला आनंद देणारे असते तशाच प्रकारे वाचक आणि समीक्षक देखील कलाकृतींचा आनंद घेत असतात असे त्यांनी सांगितले. कोणत्याही भाषेचे सौंदर्य हे अर्थ भाव व विचार यात दडलेले असते. सहित्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दार्थ, वाच्यार्थ व अर्थार्थ या तीन अर्थाबरोबरच कवीला अपेक्षित असलेला अर्थ व वाचकाला समजलेला अर्थ असे पाच अर्थ जाणून घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. प्राचार्य शिवाजी साळुंके यांनी स्वानुभव कथन करून साहित्याचे महत्त्व सांगितले. मानसी चिटणीस यांनी आपल्या लेखनाची वाटचाल कथन केली. करणसिंग तडवी, राजश्री पाटील, वर्षा कल्याणकर, गजमल पाटील, विद्या उन्हाळे, जया नेरे, आनंदा पाटील, संध्या महाजन, किरण पाटील, अनिल महाजन यांनी मनोगत व्यक्त केले तर साईनाथ फुसे व धनंजय गव्हाळे यांनी कविता सादर केल्या. डॉ. जगदीश पाटील यांनी ‘सुगंधी बाग आहे ती’ ही गझल सादर केली. सूत्रसंचालन माधुरी चौधरी यांनी तर आभार प्रकाशक निर्मोही काशिनाथ भारंबे यांनी मानले.