मंत्रालय आपत्ती व्यवस्थापन कक्षातून हॉटलाईनने साधला संपर्क
मुंबई | ‘‘नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय’’…काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून मुंबई महापालिका व पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षाला स्वत: हॉटलाईनवरून संपर्क करून मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. मुंबई शहर तसेच उपनगरात आणि राज्यात इतरत्र सुरू असलेल्या पावसाची आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची त्यांनी माहिती करून घेतली.
दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबई शहरात कुठल्या ठिकाणी पाणी तुंबले आहे, झाडे पडली आहेत, कोणी जखमी झाले का, वाहतुकीची तसेच दळणवळणाच्या स्थितीची माहिती करून घेतली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकूण परिस्थितीची थोडक्यात माहिती दिली. मुंबई शहरात 25 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारींची नोंद झाली असून मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे झाडे पडल्याच्या तक्रारींची संख्या वाढली आहे. मात्र, सुदैवाने त्यामुळे कुणीही जखमी झाल्याची घटना घडलेली नाही, असे त्यांनी सांगितले. जोरदार पावसामुळे दळणवळणाच्या साधनांवर परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल सेवा तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तुंबलेले पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंप लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
शासकीय कर्मचारी अडीच वाजता बाहेर
मुंबईतील शासकीय कार्यालयील कर्मचाऱ्यांना दुपारी अडीचनंतर घरी सोडण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था व विभागाच्या मी संपर्कात आहे. मुंबईत बसविलेल्या सीसीटिव्ही प्रणालीमुळे एकाच ठिकाणी बसून शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवले जात आहे. हवामान खात्याच्या पुढील 24 तासांसाठी असलेल्या अंदाजाची माहिती घेऊन ती वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी केले.
धार्मिक स्थळांमध्ये आश्रय
मुंबईत धो-धो पाऊस पडल्यामुळे ठिकठिकाणी साचलेले पाणी, खोळंबलेली रस्ते वाहतूक आणि रेल्वेसेवा ठप्प पडल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना हिंदू, जैन, शीख तसेच ख्रिस्ती धर्मीयांच्या धार्मिक स्थळांनी मदतीचा हात दिला आहे. वडाळा राममंदिर येथील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात जेवण व पाण्याची सोय करण्यात आल्याचे मंडळाचे समन्वयक सुभाष पै यांनी सांगितले. सिद्धीविनायक मंदिराच्या आवारातही अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुंबईतल्या जैन देरासरमध्ये तसेच मंदिरांमध्ये राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे कीर्ती कांथेर यांनी सांगितले. सायन कोळीवाडा येथील दशमेश दरबार गुरूद्वारात तसेच इतर कोणत्याही गरूद्वारात अशी सोय करम्यात आल्याचे हरनीत सिंह खालसा यांनी सांगितले. ख्रिस्तीधर्मीयांच्या चर्चेमध्येही लोकांसाठी सोय करण्यात आली होती, असे फादर प्रकाश रूमाव यांनी सांगितले.
शाळा-महाविद्यालये बंद
मुंबईतल्या पावसाची तीव्रता आणि हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना बुधवारी शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.