पर्जन्यसरींच्या स्वागतात बाप्पा आले!

0

पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, असा जयघोष करत, ढोल-ताशांच्या निनादात, गुलाल अन् फुलांची उधळण करत अत्यंत उत्साहात गणरायाचे शुक्रवारी पुणेसह महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात आगमन झाले. गणरायांच्या आगमनाला पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पर्जन्यसरींनीदेखील हजेरी लावली होती. यंदा पुणेकर सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहेत. पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना सांगली येथील संभाजी भिडे गुरुजी यांच्याहस्ते झाली. मंडळाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने सव्वाशे सुवासिनींनी गणपतीचे औक्षण केले. मानाचे गणपती असलेले तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालिम, तुळशीबाग आणि केसरीवाडा येथील गणपतींचीही विधिवत प्रतिष्ठापना झाली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि अखिल मंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिष्ठीत गणरायांचीही विधिवत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना झाल्याने पुणे शहर गणरायांच्या भक्तिरंगात न्हाऊन गेल्याचे दिसून येत होते. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या, तसेच गणरायांचे विलोभनीय रुप डोळ्यात साठविण्यासाठी गणेशभक्तांत चढाओढ दिसून आली. मानाच्या गणपतींची मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनीही सुटकेचा निश्वास टाकला.

पंतप्रधानांकडून मराठीत शुभेच्छा!
गणेश मंडळांच्या कार्यकर्ते व गणेशभक्तांनी पावसाची तमा न बाळगता मोठ्या दिमाखात प्रतिष्ठापना मिरवणुका काढल्या. पावसाच्या सरी बरसत होत्या, त्यात ढोल खराब होऊ नये म्हणून अनेक ढोल पथकांनी ढोलाच्या पानांना कापडी टोप्या लावून ढोलवादन केले. गणरायांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर वरुणराजाने काहीकाळ विश्रांती घेतली, जणू गणरायांवर पर्जन्याभिषेक करण्यासाठीच त्याने हजेरी लावली होती. पुणेसह पिंपरी-चिंचवड शहरांतही घराघरांत उत्साही वातावरणात गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. आरती, गणपती स्तोत्र, मंत्र असे मंगलदायी वातावरण घरोघरी पहावयास मिळाले. बाप्पांच्या आगमनामुळे दोन्हीही शहरांत चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेशोत्सवासाठी खास मराठीतून शुभेच्छा दिल्यात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने यंदा गणपती बाप्पाला 40 किलो सोन्याचे अलंकार चढविण्यात आले होते.