मुंबई । बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्टच्या उत्पन्नात वाढ होणे जरुरीचे आहे. यासाठी मुंबईला रोज भेट देणार्या सरासरी साडेचार लाख पर्यटकांसाठी मुंबई दर्शन घडवण्यासाठी बेस्टने विशेष बस सेवा सुरू करावी, अशी सूचना नगरसेवक व बेस्ट समिती सदस्य अतुल शाह यांनी बेस्ट समितीत केली.
बेस्टच्या बैठकीत अतुल शाह यांनी बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी आणि प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी विविध सूचना केल्या. ते म्हणाले की, मुंबई शहरात रोज सुमारे साडेचार लाख पर्यटक भेट येतात. त्यांना विविध स्थळांना भेट द्यायची असते. पण बेस्टच्या बसने तेथे कसे पोहोचायचे हे माहिती नसते. हे पर्यटक बेस्टकडे वळवण्यासाठी बेस्टने विविध ठिकाणांना भेट देण्यासाठीची पॅकेजेस सुरू करावीत. कुलाबा-फोर्ट-नरिमन पॉइंट भागात पर्यटनासाठी सुविधा ठरलेल्या निलांबरी व विभावरी या उघड्या बसेस आकर्षक कराव्यात. मुंबईत बेस्टच्या बसेसने पर्यटक ठिकाणांना सहजपणे व किफायतशीर दरात कसे भेट देऊ शकतील, याची माहिती पुणे-नागपूर इत्यादी राज्याच्या अन्य शहरांमध्ये ठळकपणे उपलब्ध करून द्यावी. बेस्टचा ब्रँड अँबेसेडर नेमावा तसेच बेस्टचे टपाल तिकीट काढावे.