पर्याय देऊ पण नॅनो बंद करणार नाही

0

कोलकाता – जगातील सर्वात स्वस्त असलेली आणि रतन टाटा यांच्या स्वप्नातील भारतीय कार असलेल्या नॅनोचे उत्पादन पूर्णपणे बंद न करता त्याला एक पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची योजना कंपनी आणणार आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर यांनी आज ही घोषणा केली. त्यांनी नॅनोशी लोकभावना निगडित असल्याचे सांगून नॅनो भारतात कायम राहिल अशी ग्वाही दिली.

कंपनीकडून कारचे इलेक्ट्रीक मॉडेल तपासले जात असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी बोरवणकर यांनी त्याची सुकरता (फिजिबिलीटी) किंवा बाजारातील पदार्पणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

मागील सर्वसाधारण सभेत भागधारकांनीही नॅनो सुरू रहावी असा आग्रह धरला होता. त्यामुळे नॅनोशी फारकत घेणे शक्य नाही असे बोरवणकर यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्य प्रवासी वाहनांवर टाटा कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे. टाटा कंपनीला पुढील एक ते दोन वर्षात प्रवासी वाहनांच्या उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर उडी घ्यायची आहे. सध्या त्यांचा या क्षेत्रात पाचवा क्रमांक आहे.