युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन
मुंबईः आज जागतिक पर्यावरण दिन असून या दिनी राजकीय प्रदूषण आणू इच्छित नसल्याचे वक्तव्य युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयात केले. उभय नेत्यांमध्ये उद्या बैठक होणार असून दोन्ही पक्षांचे प्रमुख याबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यावर आता बोलणे योग्य ठरणार नाही, असे सांगत भाजप अध्यक्ष अमित शहा बुधवारी मातोश्रीला भेट देणार असल्याच्या चर्चेबाबत आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. यावेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या राजीनाम्याविषयी ते म्हणाले की, सावंत यांनी राजीनामा दिला असून ते आता पक्षासाठी झोकून काम करतील.
ग्लोबल वार्मिंग आणि वातावरणात बदल ही जगासमोर मोठी समस्या असून पर्यावरण टिकले तरच आपण टिकू आणि भविष्यात राजकारणासाठी जगू शकतो, असेही त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश तसेच प्लास्टिक बाटल्याचे विघटन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
हे देखील वाचा
गुजरातमधून राज्यात प्लास्टिक येतेय!- पर्यावरण मंत्री
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मात्र प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. राज्य सरकारने पर्यावरण संवर्धानासाठी राज्यात प्लास्टिक बंदी केली असली तरी त्याची प्रत्यक्षात अमंलबजावणी होत नाही. राज्यात दररोज बाराशे टन प्लास्टिक तयार होते. परंतु त्याचे विघटन होण्याचे प्रमाण कमी आहे. प्लास्टिकचे विघटन करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असताना गुजरातमधून राज्यात प्लास्टिक दाखल होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ज्या व्यापाऱ्यांच्या बाटल्या पकडल्या त्याच व्यापाऱ्यांनी प्लास्टिकबंदीविरोधात कोर्टात धाव घेतल्याची धक्कादायक माहिती कदम यांनी यावेळी दिली.