भुसावळ। नागरिकांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा, गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धन करावे, स्थापन करण्यात येणारी मुर्ती शाडु मातीची असावी या प्रमुख उद्देशाने अखिल भारतीय बहुभाषिक नाट्य परिषद आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाडु मातीपासुन गणेश मुर्ती निर्मिती कार्यशाळा शनिवार 22 रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत येथील सार्वजनिक वाचनालय येथे यशस्वीरित्या पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत ठाकुर यांच्याहस्ते शाडु मातीचे विधिवत पुजनाने करण्यात आले.
20 जणांना दिले प्रशिक्षण
कार्यशाळेत 20 जणांना मुर्ती घडविण्याचे प्रशिक्षण येथील प्रख्यात कलावंत व मुर्तीकार रमाकांत भालेराव यांनी दिले. यात जळगांव व भुसावळ येथील आबालवृध्दांचा समावेश होता. मागील अनेक वर्षांपासुन रमाकांत भालेराव हे नागरिकांना शाडु मातीपासुन मुर्ती घडविण्याचे प्रशिक्षण देत असुन यातुन पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देत आहेत. या कार्यशाळेत देखील सहभागींना भालेराव यांनी प्रात्यक्षिकासह मुर्ती घडविण्याचे प्रशिक्षण दिले व सुबक आणि सुंदर गणेशमुर्तींची निर्मिती करुन घेतली. तसेच घडविलेल्या मुर्ती प्रशिक्षणार्थींनी आपल्या घरी नेल्या.
पालकांचाही मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मातीच्या मुर्ती घडविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य संयोजकांनी पुरविले. प्रसंगी उपस्थित असलेल्या पालतकांमध्ये देखील मोठा उत्साह दिसुन आला. कार्यशाळेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन उदय जोशी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शंभु गोडबोले, उदय जोशी, शुभम कुळकर्णी, अजिंक्य नाईक, भाग्यश्री एकलारकर, निखील गाडेकर,धर्मराज देवकर, रविशंकर सावखेडकर, संतोष चव्हाण यांच्यासह सार्वजनिक वाचनालयच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.