पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याची गरज

0

यावल । होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर डेरेदार वृक्षांची कत्तल करुन ते होळीत जाळले जातात यातून निर्माण झालेल्या धुरामुळे वायु प्रदुषण तर होतेच शिवाय वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल देखील ढासळतो, तर धुळवडीला पाण्याची नासाडी न करता कोरडे व नैसर्गिक रंग वापरुन पर्यावरण पुरक होळी साजरी करणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हरितसेना शिक्षक लिलाधर वानखेडे यांनी केले. तालुक्यातील अंजाळे येथील नुतन विद्या मंदिर माध्यमिक शाळेत होळी निमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना होळीचे महत्व सांगताना ते बोलत होते.

वृक्षांच्या कत्तली थांबविण्याचे आवाहन
होळी केवळ रंगांची उधळण व वृक्षांची कत्तल करुन साजरी करणे नव्हे तर त्यातून सामाजिक ऐक्य निर्माण होणे महत्वाचे आहे. वाढते प्रदुषण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा होणारा र्‍हास लक्षात घेतला पाहिजे. होळी तयार करण्यासाठी वृक्षांची कत्तल थांबवून टाकाऊ वस्तूंचा वापर करुन पर्यावरण पुरक होळी साजरी करणे आवश्यक आहे. यातून होळीचा वैज्ञानिक विचार अंगीकारला पाहिजे. सध्याचे रासायनिक रंग हे त्वचेसाठी हानिकारक असतात ते धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असते. उन्हाळ्यात पशु पक्षी पाण्यासाठी भटकंती करीत असतात त्यामुळे पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. असेही वानखेडे यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापक डी.व्ही. बोरोले यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.