पुणे । महापालिका तब्बल 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देऊन विक्रम करणार असून त्याची नोंद गिनीज बुकमध्ये केली जाईल, यासाठी महापालिका सज्ज असून आज या उपक्रमाची सुरुवात झाली, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, माणिकताई दीक्षित आदी यावेळी उपस्थित होते. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या थर्मोकोल, प्लॅस्टिकच्या किंवा इतर तत्सम शोभिवंत वस्तूंमुळे आपण पर्यावरणाचा र्हास करत असून आता मुलांनीच याबाबत जनजागृती करावी. भिमाले यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाची ही आदर्श शाळा करण्याकडे लक्ष द्या असे सांगून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना केली. विसर्जनाच्यावेळी निर्माल्यही वेगळ्या पेटीत टाकण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येईल
शाळेतील विद्यार्थ्यांना राज तांबोळी,अनुराधा एडके,कन्याकुमारी घाडगे यांनी प्रशिक्षण दिले. मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शर्मिला जाधव यांनी केले.