पुणे । बाप्पाच्या आगमनाची तयारी आता प्रत्येक घरात सुरू झाली आहे. या तयारीत घरातले लहानगेही तितक्याच उत्साहात सहभागी होत आहेत. घरकाम करणार्यांच्या मुलांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या आश्रय या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने याच गणेशोत्सवाचे औचित्य साधत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
माती, नैसर्गिक रंग यांच्या मदतीने घरकाम करणार्या कामगारांच्या मुलांनी आपला बाप्पा साकारला. या कार्यशाळेचे वैशिष्टय म्हणजे या प्रत्येक मूर्तीत एका झाडाच्या बीचे रोपण करण्यात आले. जेणे करून जेव्हा या बाप्पाचे विसर्जन होईल तेव्हा त्यातून एक झाड उगवेल. विद्यार्थ्यांसाठी ही कल्पना नवीन होती. मात्र त्याचे महत्त्व सांगितल्यानंतर त्यांनी याचे स्वागत करीत वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. या कार्यशाळेसाठी रुबी झुणझुणवाला यांच्या अडीपा या संस्थेची देखील मदत झाली.