पुणे । मागील वर्षीप्रमाणे यंदाही महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार असून मूर्ती विरघळण्यासाठी प्रशासनामार्फत 100 टन अमोनिअम बाय कार्बोनेट मोफत वाटण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, घनकचरा विभागप्रमुख सुरेश जगताप, एम.के. सी. एलच्या डॉ शुभांगी उंबरकर आदी उपस्थित होते.
शहरातील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी मागील वर्षापासून महापालिका हा उपक्रम राबवत आहे. यामध्ये महापालिकेची सर्वक्षेत्रीय कार्यालयालयांमध्ये नागरिकांना मोफत अमोनिअम बाय कार्बोनेटची पावडर दिली जाते. पाण्यात ही पावडर मिसळून त्यात मूर्तीचे विसर्जन केले असता काही तासांत मूर्ती विरघळते. हाच उपक्रम यंदाही राबवण्यात येणार असून महापालिकेसह एमकेसीएल आणि कमिन्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन करण्यात आले आहे.
घरच्याघरी गणेश विसर्जन करण्याचे आवाहन
पुणे महापालिकेतर्फे काही विसर्जन घाटावर उभारण्यात आलेल्या हौदामध्ये या पद्धतीचा अवलंब करून पर्यावरण पूरक पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पद्धतीचा वापर घरगुती छोट्या गणेश मूर्तीपासून ते गणेश मंडळाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी करता येणार आहे. तसेच महापालिकेतर्फे अमोनियम बायकार्बोनेटचे दोन किलोचे पॅकेट नागरिकांना देऊन घरच्याघरी गणेश विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
गणेश विक्रत्यांकडेही उपलब्ध
याबाबत अधिक माहिती देताना टिळक यांनी यावर्षी अमोनिअम बाय कार्बोनेट गणेशमूर्तीची विक्रेत्यांकडेही उपलब्ध असणार असल्याची महिती दिली. मागील वर्षी माहिती नसल्याने काही मूर्ती पूर्णपणे विरघळल्या नाहीत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यावर उपाय शोधण्यात आला असून मूर्तीच्या आकारानुसार पाण्याचे आणि अमोनिअम बाय कार्बोनेटचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत गणेश विसर्जन करावे असे आवाहन टिळक यांनी केले.
मूर्तीचा आकार बादलीची व्याप्ती पाण्याचे प्रमाण अमोनिअम बाय कार्बोनेटचे प्रमाण
6 इंच 10 लिटर 8 लिटर 1 किलोग्रॅम
7ते 10इंच 15 लिटर 10ते12 लिटर 2 किलोग्रॅम
11ते14इंच 25लिटर 20ते 22लिटर 4 किलोग्रॅम
15ते 18इंच 50लिटर 40ते 45 लिटर 6किलोग्रॅम