पुणे : विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी. तसेच महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे आदेशच राज्याच्या उच्चशिक्षण विभागाने पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना दिले होते. या लेखी आदेशासोबत महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी हिंदू जनजागृती समितीचे पत्रही जोडले आहे. या धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. राज्याची वाटचाल अश्मयुगाकडे सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया अंधश्रद्धा निमुर्लन समितीने व्यक्त केली आहे. पुण्यात सोवळेप्रकरण ताजे असतानाच हा प्रकार उघड झाला आहे.
विद्यार्थ्यांचा धार्मिकविधीत हस्तक्षेप नको
28 ऑगस्टरोजी हिंदू जनजागृती समितीने उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक विजय नारखेडे यांना एक पत्र दिले होते. महाविद्यालयातील तरुण पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करावे म्हणून लोकांवर दबाब टाकतात, त्यांना मनाई करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. या पत्राची दखल सहसंचालकांनी तातडीने घेतली व या पत्रानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेशच काढले होते. सोबत हिंदू जनजागृतीचे पत्रही जोडण्यात आले. हा लेखी आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे निर्देश विद्यापीठांतर्गत येणार्या सर्व महाविद्यालयांना दिले होते.
…तर शासनाने सती प्रथा सुरू करावी
अंनिसने सुरू केलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेस आघाडी सरकारने पाठिंबा देत हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्वत्र राबविला होता. मात्र, यावर्षी यासंदर्भात मनाई आदेशच राज्य सरकारकडून आल्याने या उपक्रमावर आणि एकूणच पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नुकतेच पुणे शहरात सोवळेप्रकरण पेटलेले असताना आता पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला शासनाचाच विरोध होता, हे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना अंनिसचे प्रधान सचिव मिलींद देशमुख म्हणाले, की धर्माचा आधार आहे म्हणून शासनाने सती प्रथा सुरू करावी व पुन्हा अश्मयुगाकडे वाटचाल करावी.