रावेर। तापमान वाढ, पाणीसमस्या आणि वन्य जीवांचा होणारा र्हास यावर मात करण्यासाठी पर्यावर हिताच्या गोष्टी अंगीकारून वृक्ष संवर्धन करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे उपवनसंरक्षक संजय दहिवले यांनी रावेर येथील पंचायत समिती सभागृहात पेसा कायद्यांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सांगितले. या कार्यशाळेत गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, आर.बी. सोनवणे, व्ही.एम. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
पेसा मधील गावांच्या समस्या जाणून घेणार
प्रास्ताविक तालुका समन्वयक पी.एल. मोरे यांनी केले. वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी जुलै 2017 मध्ये शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमे बाबत मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे यांनी पेसा मधील गावांच्या समस्या जाणून घेवून त्यावर त्वरित मार्ग काढून आदिवासी बांधवांच्या हितासाठी आवश्यक सर्व विकासकामांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दहिवले यांनी वनोपज, नैसर्गिक साधन सामुग्री, डिंक, तेंदूपत्ता यावर प्रक्रिया करणारे उद्योग याविषयी सांगतांना आगामी पावसाळ्यात सातपुडा पर्वतात आणि आदिवासी गावांमध्ये रोपवन करतांना कड, वड, चिंच, बांबू, आवळा आदी झाडे लावण्याचे आवाहन करून वन वणवा आटोक्यात ठेवण्यासाठी आपण सहकार्य करण्याचेही सांगितले. या कार्यशाळेत संयुक्त वन समिती यांना रोखा लेखा रजिष्टर बाबत तसेच लिलाव पद्धत यात मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन जाधव यांनी केले.