पर्यावरणाचा संदेश देणारे विजया वाड यांचे ‘फुलवा’ बालनाट्य

0

मुंबई । सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड लिखित ‘फुलवा’ हे संपूर्ण पर्यावरणप्रेमी बालनाट्य असून लवकरच ते पुस्तक स्वरूपात डॉ. सुखदा म्हात्रे-चिरोटे यांच्या प्रयत्नातून साकारले जात आहे. या बालनाट्याचे प्रयोग करण्यासाठी संहितेचा विनामूल्य उपयोग करून पर्यावरणाचा संदेश प्रसारित करता येईल, फक्त प्रथम प्रयोगासाठी एक गरजू अंध मुलीस 251 रुपयांचे पारितोषिक द्यावे, असे आवाहन डॉ. विजया वाड यांनी केले आहे. सातपुड्याच्या फुलवल्ली गावातील ही कथा असून, त्याची नाट्यनिर्मिती डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्टने निर्मिती केली आहे. डॉ. पद्मजा फेणाणी-जोगळेकर, वैशाली सामंत यांची यात गाणी असून, आवाज डॉ. निशिगंधा वाड, डॉ. विजया वाड, पराग सावंत, एकनाथ आव्हाड, नितांशू सावंत, डॉ. वाणी सानेकर, निरूपमा श्रीवास्तव यांनी आवाज दिला आहे.

पवार पब्लिक स्कूलच्या 33 विद्यार्थ्यांचा यात सहभाग
चांदिवली येथील पवार पब्लिक स्कूलच्या 33 विद्यार्थ्यांचा यात सहभाग असून डॉ. मधुरा फडके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. संदेश विद्यालय, विक्रोळी, कमला मेहता स्कूल फॉर दी ब्लाइंड या शाळांमधील मुलांचाही यात सहभाग आहे. त्यांनीदेखील गाणी म्हटली आहेत. नाटकाचे ध्वनिमुद्रण नॅब संस्थेत झाले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सहकार्याने त्याची ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली असून, लवकरच ती बालकोशाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल. कनक रेळे यांच्या शिष्या पल्लवी परब यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. डॉ. समृद्धी, डॉ. सुखदा म्हात्रे, मनोहर म्हात्रे, आशा आर्य, राजू माखिजा, वेदांत काशीकर, सविता बिर्‍हाडे, रमेश शहा यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले आहेत.

मनाला भिडणारी कथा
नृत्यालयात घाम गाळणारी फुलवा कठोर परिश्रमातून नृत्यमयूरी होते नि परत सातपुड्याच्या कुशीत जाते, निसर्ग नृत्यालय काढून खेडोपाडी मुलांना शिकवते. सातपुड्याच्या फुलवल्ली गावातील आठ वर्षांची फुलवा आपल्या कोकरांसगे नाचत व गाणे म्हणत असताना दगडांचा अभ्यास करणारा श्यामदादा तिला नर्तकी करण्याचे ठरवते आणि मुंबईत नृत्यालयात आणतो. तिथे ती बावरते आणि घाबरून परत गावी जाण्याचे ठरवते. पण दुसर्‍या दिवशी सकाळी घनश्याम सुंदरा या भूपाळीचे स्वर कानी पडताच तिथे थिबकते आणि नृत्य करायला लागते. हा सारा प्रवास हा बालनाट्यातून पर्यावरणविषयक संदेश देणारा आहे. त्यामुळेच त्याचा प्रसार व प्रचार अधिकाधिक ठिकाणी व्हावा, शाळा, विद्यालय, विविध संस्थांनी त्याचे अधिकाधिक प्रयोग करावेत, यासाठी डॉ. विजया वाड यांनी ही संहिता विनामूल्य देण्याचे ठरवले आहे. फक्त एका अंध मुलीस फक्त पहिल्या प्रयोगाचे 251 रुपये पारितोषिक द्यावे, असे त्यांचे प्रांजळ आवाहन आहे.