चिंचवड : पर्यावरणाचे संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, असे मत माजी नगरसेवक अरुण बोर्हाडे यांनी व्यक्त केले. चिंचवड येथे आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि गोलांडे इस्टेट मित्रमंडळ यांच्या वतीने ‘पर्यावरण पुरस्कार’ वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहररचना साहाय्यक उपायुक्त प्रभाकर नाळे होते. पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणार्या समाजातील विविध घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रातिनिधिक पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.
यामध्ये जलदिंडीच्या माध्यमातून कार्यरत असलेले भावसार व्हिजनचे सर्वेसर्वा राजीव भावसार, अनेक वर्षांपासून वृक्षांची जोपासना करणारे ज्येष्ठ वृक्षमित्र सखाराम पाटील, महानगरपालिका कर्मचारी नंदकुमार ढवळसकर, घंटागाडी कर्मचारी सोपान लांडे यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविक केले. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव रवींद्र कुलकर्णी यांनी आभार मानले. सुहास पोफळे, कैलास भैरट, अजित मळेकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजन केले.