जळगाव । राज्याच्या वनमंत्रालयातर्फे नियंत्रित राज्यस्तरीय वृक्षलागवड सप्ताहातंर्गत विविध स्वयंसेवी संस्थेतर्फे जिल्ह्याभरात वृक्षलागवड मोहिम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोटरीतर्फे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत रत्नाकर नर्सरी परिसरात रोटरी सभासदांच्या माध्यमातून रोप वाटप करण्यात आले.
यावेळी ‘वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठया प्रमाणात हानी झाली आहे. पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड अतिशय महत्वाची आहे. पर्यावरणाची ही गरज ओळखून वृक्ष लागवडीचा रोटरी क्लब ईस्ट चा उपक्रम उपयुक्त आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास निश्चितपणे मदत होईल’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत आज येथील रत्नाकर नर्सरी येथे रोटरी क्लब ईस्ट च्या वतीने त्यांचा सभासदांना विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांचे वाटप जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रोटरी क्लब ईस्ट चे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, सचिव मनीष पात्रीकर, रत्नाकर नर्सरीचे मालक रत्नाकर सराफ आदि उपस्थित होते. तसेच यावेळी चार कोटी वृक्ष लागवड मोहिम संपूर्ण जिल्हयात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आज दुपारी बारा वाजेपर्यंत 2 लाख 47 हजार 651 वृक्ष लागवड झाल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.