कर्जत – जगातील वाढते तापमान, प्रदूषणामुळे पर्यावरणात मोठे बदल होत आहेत. याचे परिणाम मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील आदिवासी जनजीवनावर पडताना दिसून येत आहेत. हे परिणाम रोखण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वानीच प्रयन्त केले पाहिजेत असे मत ऑल कार्गो लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीच्या मैत्री प्रकल्पाचे डॉ. नीलरतन शेंडे यांनी व्यक्त केले.
पर्यावणाचे संवर्धन करणे, ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराचे आणि त्याच्या उपजीविकेचे साधन निर्माण करून देणे, तसेच प्रदूषण मुक्त भारत करण्यासाठी ऑल कार्गो लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीच्या मैत्री प्रकल्प तसेच लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या जागृती प्रकल्पाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करीत आहे. या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागातील 28 गावातील 675 अल्प भूधारक शेतकर्यांना मोफत 40 हजार 500 फळ झाडांचे वाटप नुकतेच करण्यात आले. या वेळी वावळोली ग्रामपंचायती मध्ये शेतकर्यांना झाडे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. नीलरतन शेंडे यांनी शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले या प्रसंगीं जागृती प्रकल्पाचे समन्वयक गौतम कनोजे, कृषी सल्लागार कन्हैया सोमणे, विद्यानंद ओव्हाळ, मयुरेश माळी, सागर केवारी, नितीन केवारी, राजेश भोईर, करिष्मा कोळंबे, हरिभाऊ व्होला तसेच ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.