नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्ली सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे. हवा प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला असून लोकांना श्वास घेण्यासही अडचणी येत आहेत. आता दिवाळी सणही येत असल्याने या काळात फटाक्यांमुळे दिल्लीतील हवा अधिकच विषारी बनणार आहे. याची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काळजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सण साजरे करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याबाबत सामाजिक संघटनांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करावी अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.
दिल्लीत आंतरराष्ट्रीय आर्य महासम्मेलन २०१८ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती कोविंद उपस्थित होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
गेल्या काही आठवड्यात दिल्लीतील हवेचा दर्जा कमालीचा घसरला असून त्यामुळे दिवसभर शहरात धुसर वातावरण असते. याला काही नैसर्गिक कारणे असली तरी शहरातील वाहनांमधून होणारे प्रदुषण, बांधकाम उद्योगामुळे उडणारी धूळ तसेच शेजारील पंजाब आणि हरयाणा सारख्या राज्यांमध्ये थंडीच्या काळात नव्या गव्हाच्या हंगामासाठी जुन्या निघालेल्या पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण मोठे असल्याने त्याचा थेट परिणाम दिल्लीतील हवेवर होत असतो. दिल्लीतील हवा प्रदुषणाची ही समस्या आता नेहमीचीच बनली असून श्वसनासाठीही त्रास होत असल्याने परिस्थिती गंभीर आहे.