पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे काम मोठे : डॉ. अनिल अवचट

0

पुणे । एक काळ असा होता की पर्यावरणवाद्यांची हेटाळणी केली जायची, आज मात्र काळ बदलला आहे. पर्यावरणवाद्यांकडे आज आस्थेने पाहिले जात आहे. पर्यावरणाचा धोका खूप वर्षांपासून आहे. पण आज अगदी विनाशापर्यंत आल्यावर का होईना, आपल्याला त्याची जाणीव होते आहे, हे चांगलेच आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍यांकडे पाहून पर्यावरण विचार शिल्लक असल्याची जाणीव होते आणि हे सगळे टिकून राहील या बाजूने मन आशावादी होते. पर्यावरणक्षेत्रात काम करणारे खूप मोठे काम करत आहेत, अशा भावना ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केल्या. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत भरविण्यात आलेल्या ‘इको बझार’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इको बझारच्या निमंत्रक गौरी किर्लोस्कर, अध्यक्ष माधव चंद्रचूड, संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.

हे स्टॉल्स उभारताना लाकडी क्रेटचा वापरण्यात आले असून फ्लेक्सचा वापर कटाक्षाने टाळण्यात आला आहे. या ‘इको बझार’मध्ये उत्पादने, सेवा, सेंद्रिय खाद्यपदार्थ, फॅशनवेअर, फर्निचर या विभागांतर्गत विविध पर्यावरणपूरक गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. बायोगॅस व सौर ऊर्जेवर आधारित उत्पादनांचाही वेगळा विभाग या ठिकाणी पाहायला मिळेल. मातीचा वापर करून घर बांधावे कसे, याचे छोटेखानी मॉडेल इथे उभारण्यात आले आहे.

40हून अधिक संस्थांचे स्टॉल्स
‘इको बझार’ पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन इथे सुरू असून 8 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी तो खुला असेल. पुण्यासह जव्हार, मुंबई, कोचीन, हंपी, बेंगलोर अशा देशातल्या विविध भागात काम करणार्‍या 40हून अधिक संस्थांचे इथे स्टॉल्स आहेत. मातीचा वापर करून घर बांधावे कसे, याचे छोटेखानी मॉडेल तयार करण्यात आले होते. त्याचे अवचअ यांनी कौतुक केले.