पृथ्वीवरील जीवसृष्टी ज्या विशिष्ट अधिवासात व नैसर्गिक परिस्थितीत जगते, त्या सर्व पार्श्वभूमीला सर्वसाधारणपणे ‘पर्यावरण’ असे म्हटले जाते. या पर्यावरणातील एक घटक म्हणजे माणूस. या माणसाच्या बुद्धिमत्तेमुळे आज पृथ्वीवर त्याचे अधिपत्य आहे. अनभिषिक्तपणे सर्वांवर तो हुकुमत गाजवत आहे. मात्र उन्मत्त होऊन पर्यावरणाची पर्वा न करता जर त्याने विकास साध्य करण्याचे ठरविले तर तो विकास साबणाच्या फुग्याप्रमाणे आकर्षक दिसेल पण क्षणभंगूर ठरेल. आपले जीवनदायी पर्यावरण हा पूर्वजांकडून मिळालेला मालकीहक्काचा वारसा नसून आपल्या पुढील पिढ्यांकडून उसना घेतलेला ठेवा आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कर्ज जसे व्याजासह परत फेडावे लागते तसे हे पर्यावरण अधिक सुखदायी व सुरक्षित कसे करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. आपल्या मुलाबाळांच्या विकासाच्या आशाआकांक्षा उमलतील, असे पर्यावरण निर्माण करणे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपण जास्त काही नाही थोडं दक्ष राहिला पाहिजे. बस्स एवढंच!
यावर्षी राज्यभर समाधानकारक पाऊस पडला आहे. यामुळे बळीराजासह सर्वांचीच चिंता दूर झाली आहे. परंतु, जर पाऊसच पडला नाही तर आपल्या सर्वांचे काय होणार? आपण जगणार कसे? मागील काही वर्षांत राज्यासह देशाला दुष्काळाने घेरले होते. याची आठवण जरी आली तरी मन उदास होते, दुःखाच्या खाईत लोटते. असो.
सध्याच्या स्थितीत विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास होत आहे, म्हणून प्रदूषणाचे प्रमाण कमी करून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व त्यातून चिरंतन विकास साध्य करण्यासाठी प्रामुख्याने योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मनुष्य जीवनात प्रगतीला खिळ बसून मानव संपूर्णतः रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या धरणी मातेसाठी सगळीकडे प्रदूषण वाढवून ठेवलय त्यामुळे पर्यावरण हानी होत आहे. तसे बघितले तर पृथ्वीवरील सार्या सजीव सृष्टीचा आधार हे येथील पर्यावरण आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर व विश्वात इतरत्र असे पर्यावरण नाही. त्यामुळे येथील पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे मानव जातीस नव्हे तर सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. कोट्यावधी वर्षांच्या स्थित्यंतरानंतर येथील हवा, पाणी व जमीन यांचे असे पोषक वातावरण झाले असले तरी गेल्या काही दशकात मानवी उद्योगांमुळे त्यात बरेच हानीकारक बदल होऊ लागले आहेत. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंदे आणि जंगलाचा नाश करुन वाढलेली शेती यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत घट होत आहे. तसेच हवा, पाणी व जमीन यांच्या प्रदूषणाचा प्रश्न वाढत चालला आहे. या जगाची वाटणी श्रीमंत देश आणि अविकसित गरीब देश अशा दोन गटात करण्यात येते. विकसित देश नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर दरडोई खूपच जास्त करतात परंतु तेथील लोकसंख्या मर्यादित आहे. याउलट अविकसित देशात गरिबी व मोठी लोकसंख्या यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती कमी वापरूनही पर्यावरणाचा र्हास जास्त होत आहे. पर्यावरण रक्षण की गरिबी ऊन्मूलन या दुहेरी पेचात हे देश सापडले आहेत. संपन्न राष्ट्रांकडून या राष्ट्रांवर पर्यावरणासाठी कडक निर्बंध पाळण्याचे दडपण येत आहे.
गाव, जिल्हा, नदीचे खोरे वा कोणताही विधिष्ट भूभाग यातील विकासाचे नियोजन करताना त्या भूभागावरील पर्यावरणाचे व नैसर्गिक साधनसंपत्तीची क्षमता विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच हवा, पाणी, जमीन या घटकांची प्रदूषके सामावून घेण्याची शक्ती ही मर्यादा धरली तर त्या धोकादायक मर्यादेपेक्षा खाली आपल्या आजच्या व भविष्याच्या विकासामुळे होणार्या प्रदूषणाचे प्रमाण राहील अशी आपण काळजी घेतली पाहिजे. माणसांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांच्या विकासाचा वेगही त्यानुसार वाढविण्याची धडपड सर्वत्र चालली आहे. मात्र हा विकास करताना आपण पुढील विकासाच्या सर्वच संधी नाहिशा करून टाकीत नाही ना याविषयी माणूस फारसा विचार करताना दिसत नाही. आजची गरज भागली म्हणजे झाले. उद्याचे कोणी बघितले? अशी वृत्ती झाली आहे व ती पर्यावरणास घातक आहे.
आपण जन्माला आलो. या जगाचे काही देणे लागतो. आपण या जगाचे सैनिक आहोत. अनेक संस्कृतींनी व ÷उच्च विचारांनी हे जग निर्माण झाले आहे. याचीही जाणीव ठेवावी. तत्कालीन परिस्थितीत छत्रपती शिवरायांनी भविष्याच्या अनेक पिढ्यांचा विचार केला. केवळ म्हणूनच आपण आज आहोत. खूप मोठ्या व्यक्तीचे विचार आपल्याला लाभले. त्यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजेत. माझे आपणास एवढेच सांगणे आहे की, निसर्गाला वाचवा. मग तो आपल्याला नक्की वाचवेल. जेवढी निसर्गाची काळजी घेऊ त्याच्या दुप्पट काळजी तो आपली घेतो.
अलीकडे पर्यावरण शिक्षणाचा शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश झाला, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. लहान वयातच पर्यावरण समस्यांची जाणीव झाली तर मोठेपणी आपली जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणाची काळजी घेणारे सुजाण नागरिक निर्माण होण्यास मदत होईल. पर्यावरणासंबंधीची माहिती व्याख्यानांद्वारे, प्रदर्शनाद्वारे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे व त्यांनी चंगळवादी जीवनशैली न स्वीकारता पर्यावरण-सुसंवादी जीवनशैली स्वीकारणे महत्त्वाचे ठरेल. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरेल. पर्यावरणाला हानिकारक कृती करणार्यांवर कठोर कायद्यांचा वापर करून दंडात्मक कारवाई झाली तरच समाजाला शिस्त लागेल व बेजबाबदार वर्तणुकीला आळा बसेल. या कडक कायद्यांमुळेच आज सिंगापूर ‘स्वच्छ’ ृशहर म्हणून ओळखले जाते.
प्लॅस्टिकसारख्या मानवनिर्मित अनेक घटकांमुळे पर्यावरणाची हानी झाली असली, तरीही पूर्वीच्या अनुभवावरून शहाणे होऊन नवीन पर्यावरण सुसंवादी सामग्रीचा शोध चालू ठेवायला हवा तरच ‘विकास आणि पर्यावरण’ या दोन्हींमध्ये संतुलन राखता येईल व पर्यावरणाची हानी न करता ‘विकास साध्य’ करता येईल. खनिज तेल, कोळसा यासारखी ऊर्जा निर्माण करणारी साधनसंपत्ती वापरल्यावर नष्ट होते व त्यामुळे काही वर्षांनी ही साधनसंपत्ती संपुष्टात येईल. ती अधिक काळ वापरता यावी यासाठी सध्या खनिज तेलाच्या जागी जलविद्युत वापरता येणे शक्य आहे का? बसने प्रवास करण्याऐवजी विजेवर चालणार्या ट्रेनने प्रवास केल्यास खनिज तेलाची बचत होईल. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्जऐवजी कापडी पिशवीचा वापर करणे चांगले. रासायनिक खतांपेक्षा शेणाचा वापर अधिक पर्यावरण सुसंवादी आहे.
एखादी वस्तू वापरून झाल्यावर लगेच टाकून देण्याऐवजी तिचा पुनर्वापर करता येईल का, याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. आपल्या अवती-भवती असणार्या अनेक घटकांचा आपण पुनर्वापर करू शकतो. उदा. शेण टाकून देण्यापेक्षा त्याचा बायोगॅस निर्मितीसाठी वापर करता येईल. तसेच नैसर्गिक खत म्हणूनही वापर करता येईल. पाण्याला जीवन असे संबोधले जाते. खरोखरच पाणी नसेल तर पृथ्वीवरील जीवनच संपुष्टात येईल व त्यासाठी पाण्याचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. तसेच, वनस्पतींच्या वाढीसाठी माती अत्यावश्यक आहे व त्यामुळे मृदेचे संवर्धन महत्त्वाचे आहे. तर, डोंगर उतारावर झाडे लावल्यामुळे मातीची धूप कमी होते, जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढते. एकंदरीत परिसंस्थेचे संतुलन कायम राखण्यासाठी वनांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. अशा तर्हेने पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वानी पर्यावरण सुसंवादी जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे. यासाठी हाव न धरता, पर्यावरणातील घटक ओरबाडून न घेता आवश्यक तेवढेच गरजेपुरते घेतले पाहिजे.
गणपती बाप्पांचे पर्यावरणपूरक विसर्जन करा…
ज्ञानाचा अधिपती, बाप्पा गणराय आले. पाच आणि सात दिवसांनी त्यांना आपण विसर्जीतही केले. आता उर्वरित बाप्पा अनंत चतुर्दशीला आपला निरोप घेणार. बाप्पांची मूर्तीही शाडू, मातीची असावी. बाप्पांचे विसर्जन नदी, विहीरींमध्ये न करता विसर्जन घाट, कृत्रिम हौदांमध्ये करावे. किंवा मग आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा अर्थात आपल्या घरातच टब किंवा पिंपामध्ये बाप्पांचे विसर्जन करावे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पण दुर्दैवाने आपल सरकार, सरकारी यंत्रणा एवढेच काय तर सर्वसामान्य जनता सुध्दा याबाबतीत उदासीन आहे. माणसाने विकासाची कितीही क्षितीजे गाठली तरी तो निसर्गाच्या पुढे कधीच जाऊ शकत नाही या वास्तवाची जाणीव होणे गरजेच आहे. जेणेकरून हा उपक्रम पर्यावरणपुरक ठरेल. माझे सांगणे एवढेच की, पर्यावरण जपा आणि निसर्गासोबत चला. निसर्गाच्या पुढे नाही तर त्याच्यासोबत चला. तरच आपण उत्तम प्रकारे जीवन जगू शकतो अन्यथा नाही!
मदन साबळे,
सामाजिक कार्यकर्ते
9850878700