पर्यावरण रक्षणासाठी जैवइंधन जनआंदोलन व्हायला हवे : प्रधान

0

पुणे । पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जैवइंधनाचा वापर वाढवून त्याला एक जनआंदोलनाचे स्वरूप यायला हवे असे मत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एमएनजीएलच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात जैवइंधनचलित दुचाकी वाहनाचे उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक राजेश पांडे उपस्थित होते. स्वतः प्रधान यांनी यावेळी ही जैवइंधनचलित दुचाकी चालवण्याचा अनुभव घेतला.

पर्यावरणपूरक इंधन वापरणे ही नागरिकांची मुख्य जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण आणि जलवायू परिवर्तन या सगळ्यांचा विचार करता आजच्या घडीला वाहनांसाठी आपण नैसर्गिक वायू वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी आज पुण्यामध्ये दुचाकी सीएनजी वाहनाचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले. पुण्याला स्वच्छ आणि आदर्श शहर बनविण्यासाठी हे पाऊल आम्ही उचलले असून यामुळे पुण्याचे पर्यावरण सुधारेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

मद्यसम्राट विजय माल्या याला काँग्रेसच्या काळात कर्ज दिले गेले. मात्र आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मोदी सरकारला प्रश्‍न करतात की, विजय माल्या याला इतक्या प्रमाणात कर्ज का दिले? असा प्रश्‍न राहुल गांधी विचारतात यावरूनच राहुल गांधी यांचे राजकीय आणि आर्थिक ज्ञान दिसून येते असा टोला त्यांनी यावेळी राहुल गांधी यांना लगावला.

2 लाख वाहने सीएनजीमध्ये परिवर्तीत
पुण्यामध्ये सध्या 2 लाख वाहने सीएनजीमध्ये परिवर्तीत झाली आहेत. यात 20 हजार चारचाकी वाहने असून इतर तीन चाकी वाहने आहेत. मात्र दुचाकी वाहनांची संख्या जास्त असल्याने दुचाकी देखील पर्यावरण पूरक होण्यासाठी पुण्यातील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एम. एन. जी. एलच्या वतीने नैसर्गिक वायूवर धावणारी दुचाकी तयार करण्यात आली असल्याचे सांगत प्रधान यांनी यावेळी एमएनजीएलचे कौतुक केले व अभिनंदन केले. सध्या प्रायोगिक तत्वावर पुण्यात 5 हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविण्यात येणार आहे व हे काम महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने हाती घेतले आहे. यामध्ये 15 हजार रुपयांमध्ये मध्ये हे सीएनजी कीट नागरिकांना उपलब्ध करून दिले जाईल तसेच या कीटसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सौजन्याने कर्ज दिले जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पुण्याचे भरभरून कौतुक
पुणे या शहराला सामाजिक, शैक्षणिक आणि सांकृतिक वारसा लाभला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हे शहर मागे राहू नये यासाठी पुणे शहरात हा उपक्रम राबवण्यात आला आहे असे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले. यावेळी खास पुणेरी पगडी देवून धर्मेंद्र प्रधान यांचे स्वागत करण्यात आले. पुणे हे शहर देशाचे आदर्श शहर आहे त्यामुळे पुणेला स्वच्छ आणि हिरवे बनवणे ही आपली जबाबदारी आहे असे ते यावेळी म्हणाले. आता लवकरच पुण्याच्या रस्त्यांवर सीएनजीवर चालणार्‍या गाड्या धावणार असल्याने पुणे शहर अधिक स्वच्छ आणि हिरवे बनेल अशी आशा धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केली.