सायकल मोहिमेतील सहभागींच्या सत्कार समारंभाचे आयोजन
निगडी : वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारे सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्याबरोबरच वैयक्तिक व सामाजिक आरोग्यासाठी नियमित सायकल वापरणे आवश्यक आहे. सायकल मोहिमांमधून आत्मविश्वास वाढीस लागतो. त्याबरोबरच आपल्या देशातील विविध परंपरा, संस्कृती आणि नैसर्गिक साधनांचा जवळून अभ्यास करता येतो. शालेय मुले व मुलींना प्रोत्साहन देऊन हजारो किलोमीटर अंतराच्या सायकल यात्रा आयोजित करणारे अध्यापक, पालक व सहभागी झालेल्या सायकलपटू हे अभिनंदनास पात्र आहेत, असे गौरवोद्गार क्रीडा भारतीचे राष्ट्रीय महामंत्री राज चौधरी यांनी काढले.
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने आयोजित केलेल्या निगडी ते कन्याकुमारी अशा सायकल मोहिमा यशस्वी करणा-या संस्थांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, प्रदीप पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, सचिन लांडगे उपस्थित होते.
सायकलपटूंचा सत्कार
या कार्यक्रमात सद्भावना, अहिंसा व पर्यावरण हा संदेश देऊन समाज प्रबोधन करीत निगडी ते श्रवणबेळगोळ अशी सायकल मोहीम यशस्वी पूर्ण केलेल्या भगवान महावीर ट्रस्टच्या सहा सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला. उत्तम आरोग्यासाठी सायकलचा वापर करण्याविषयी जनजागृती करीत निगडी ते कन्याकुमारी हे 1700 किलोमीटर अंतर सायकलवर पूर्ण केलेल्या सायकल मित्र, पिंपरी-चिंचवडच्या सात व शिक्षणाचे महत्व पटवून देतानाच शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्याचे आवाहन करीत मोहीम पूर्ण केलेल्या इंडो सायकलिस्ट क्लबच्या तीन सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा विशेष गौरव!
स्वच्छ भारत – समर्थ भारत हे अभियान राबवीत, मातृभूमी परिचय म्हणून निगडी ते कन्याकुमारी अशी सायकल सहल पूर्ण केलेल्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या मोहिमेत इयत्ता सातवी ते नववीमधील मुली व मुलांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक असे 57 जण सहभागी झाले होते. वैशिष्ट्य म्हणजे या सर्वांनी हा सर्व सायकल प्रवास पूर्ण केल्यानंतरही विवेकानंद जयंतीनिमित्त कन्याकुमारी येथे प्रत्येकी एक हजार सूर्यनमस्कार घातले.
यावेळी अमित गोरखे यांच्यासह विविध सत्कारार्थींनी आपले मनोगत व अनुभव कथन करताना अशा मोहिमांमुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा व उर्जा मिळते असे सांगितले. या कार्यक्रमासाठी मिलिंद डांगे, राजेंद्र बाबर, शैलजा सांगळे, वैदेही पटवर्धन, रविकांत कळंबकर, विजय सातपुते, दिपक पंडीत, विनीत दाते, रवी मनकर आदी उपस्थित होते. अमित अनिल खैरे यांनी उपस्थितांचा तर श्रीकांत मापारी यांनी संस्थांचा परिचय करून दिला. भास्कर रिकामे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश भिडे यांनी आभार मानले.