धुळे । जागतिक तापमानातील वाढ, ऋतु बदल याची दाहकता आणि तीव्रता कमी करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड हाती घेवून दि.1 जुलै ते 7 जुलै,2017 या सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यास प्राप्त झालेल्या 8 लाख वृक्ष लागवडीच्या उद्दीष्टाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत.
विविध विभागांच्या अधिकार्यांची उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो ) शुभांगी भारदे, उपवनसरंक्षक जी.के.अनारसे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) बी.ए.बोटे, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगर पालिका) पल्लवी शिरसाठ, उप कार्यकारी अभियंता (धुळे मध्यम प्रकल्प विभाग ) ए.व्ही.वसावे, धुळे पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता जी.एम.शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ए.एस. मोरे, कृषी उपसंचालक बी.के.वारघोड, सामाजिक वनीकरण विभागाचे एच.टी.चौधरी, माध्यमिक शिक्षण विभागाचे एम.जी.सोनवणे, सहायक वन सरंक्षक कुळकर्णी, वनक्षेत्रपाल के.बी.काकुस्ते (पिंपळनेर) एम.बी.पटवर्धन (कोंडाईबारी), एस.के.शिसव (साक्री) पी. ए. पाटील (शिंदखेडा) विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, जिल्ह्यात दि.1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत जिल्ह्यास विविध विभागांना 8 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्याच्या पुर्वतयारीसाठी वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
प्रत्येक शासकीय विभाग लावणार वृक्ष
पावसाळयात धुळे वनविभागास 4.12 लाख ,सामाजिक वनिकरण विभाग,धुळे 1.15 लाख, ग्रामपंचायती 2 लाख, कृषी विभाग 21250 नगर विकास, सार्वजनिक बांधकाम प्रत्येकी 8500,जलसंपदा विभाग-13400,सहकार व पणन वस्त्रोद्योग,उद्योग प्रत्येकी 4250,जिल्हा परिषद 5950,उच्च व तंत्र शिक्षण,आदिवासी विभाग,सामाजिक न्याय विशेष सहाय्य प्रत्येकी 2125, गृहविभाग 1700,सार्वजनिक आरोग्य,वैद्यकीय शिक्षण आणि औषधे द्रव्ये, पदूम, गृहनिर्माण विभाग प्रत्येकी 850,गृह (राज्य उत्पादन शुल्क),गृह (कारागृह),गृह (परिवहन), विधी व न्याय विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता ,महसुल विभाग प्रत्येकी 425, केंद्र शासनांतर्गत राष्ट्रीय महामार्ग 2550 असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. त्यात जनतेने तसेच स्वंयसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रामध्ये कामकरणार्या संस्था, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी देखील वृक्ष लागवड कार्यक्रमात मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.