पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या हद्दीतून पवना व मुळा नदी वाहत आहे. मात्र, या नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाने जलपर्णी कायमस्वरुपी हटविण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, असे आदेश महापौर नितीन काळजे यांनी दिले. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, आमदार महेश लांडगे आणि महापौर नितीन काळजे यांनी याबाबत सकारात्मक पुढाकार घ्यावा, आळंदीला गतवैभव प्राप्त करून द्यावे, पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी काळात आळंदीकरांसाठी शुद्ध पाणी देईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीवर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर महापौर नितीन काळजे यांनी महापालिका पर्यावरण विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेऊन तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
महापालिका हद्दीतील पवना आणि मुळा नदीपात्रात जलपर्णी वाढली आहे. त्यातच शहरातून निर्माण होणारे प्रदूषित पाणी, उद्योगधंद्यांचे रसायनमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीपात्रात सोडले जाते. परिणामी, नदीपात्राजवळील लोकवस्तीत डासांची पैदास वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला साथीच्या रोगांचा धोका निर्माण होत आहे. त्याबाबत महापौर नितीन काळजे यांनी पर्यावरण विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, जलनिःस्सारणचे अभियंता रवींद्र दुधेकर, पर्यावरणचे उपअभियंता मनोहर जावरणी उपस्थित होते.
प्रदूषणावर प्रभावी तोडगा हवा
याबाबत महापौर काळजे म्हणाले की, शहरातील पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महापालिका पर्यावरण विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जलपर्णी, नदी प्रदूषणावर प्रभावी तोडगा काढण्यात यावा. यासह प्लास्टिक पिशवीची संपूर्ण बंदी करण्यात यावी, कचरा प्रक्रिया, शहरातील स्वच्छता, कचरा डेपोचा व कचरा विघटनाचा वाढता प्रश्न, ई-कचर्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. तसेच, शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढवणे, राज्यातील महत्त्वाकांक्षी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे काम मार्गी लावणे, प्रभागनिहाय कचरा उचलण्याची यंत्रणा सक्षम करणे, शहरातील मोठी रुग्णालये, मोठ्या हाऊसिंग सोसायटी यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सक्षम करून दुबईच्या धर्तीवर जलशुद्धीकरण, दैनंदिन वापरासाठी त्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही महापौर काळजे यांनी व्यक्त केली.
कामाचा लेखी अहवाल द्या
सध्या उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिका उद्यान व पर्यावरण विभागाने पाणी बचतीबाबत कोणत्या उपाययोजना केल्या. पर्यावरण संवर्धनाबाबत पर्यावरण विभागाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या? त्याला प्रतिसाद कसा मिळाला? यापुढे प्रशासन कोणत्या प्रकल्पांवर काम करणार आहे? त्याचा शहराला काय फायदा होणार? याचा इत्थंभूत लेखी अहवाल सादर करावा. तसेच, उद्यान व गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे आदेश महापौर नितीन काळजे यांनी पर्यावरण विभागाला दिले आहेत.