पर्यावरण संवर्धन समितीच्या उपसमित्यांची नोंदणी सुरू

0

पिंपरी-चिंचवड : पर्यावरण संवर्धन समितीची सन 2016-17 या आर्थिक वर्षाची शहर कार्यकारिणीची मुदत 30 मार्चला संपली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरण विषयावर अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या पर्यावरण संवर्धन समितीकडून नव्याने संघटन करण्यासाठी सर्व उपसमित्या व पदाधिकार्‍यांची पदे बरखास्त करण्यात आली आहेत. उपसमित्यांच्या पुढील एका वर्षासाठीच्या 2017-18 नियुक्त्यांसाठी पर्यावरण संवर्धन समितीने इच्छुकांकडून माहिती मागवली आहे. शहराच्या सहा प्रभागांसाठी स्वतंत्र उपसमित्या स्थापन होणार आहेत. जेणे करून दैनंदिन पर्यावरण विषयक समस्या प्रभाग स्तरावर सोडवल्या जातील.

इच्छुकांना संपर्काचे आवाहन
पर्यावरण संवर्धन समितीचे कार्य हे सामाजिक असल्याने त्यासाठी एकदाच वार्षिक वर्गणीची किरकोळ रक्कम सुरुवातीस आकारली जाणार आहे. त्यानंतर कोणतेही शुल्क अथवा वर्गणी घेतली जाणार नाही. तरी इच्छुकांनी पुरुषोत्तम पिंपळे यांच्या 7447735083 या क्रमांकावर एसएमएस अथवा फोनद्वारे चौकशी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.