पर्यावरण संवर्धन समितीतर्फे जलपुनर्भरण यंत्रणा उभारणीचा शुभारंभ

0

पिंपरी-चिंचवड। पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरला पाहिजे, या उद्देशाने पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून जलपुनर्भरणाविषयी जनजागृती केली जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या शाळांच्या इमारतींवर जलपुनर्भरण यंत्रणा लोकसहभागातून बसविण्याचा निर्णय समितीने घेतला. या उपक्रमासाठी फिसर्व्ह इंडिया प्रा. लि. या कंपनीनेदेखील सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, वाकड येथील भूमकर वस्ती असलेल्या आबाजी भूमकर मनपा शाळेच्या इमारतीवर जलपुनर्भरण यंत्रणा बसवून या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. 17 रोजी सकाळी 9.30 वाजता हा सोहळा थाटात संपन्न झाला.

उपक्रमाचे महापौरांकडून कौतुक
पर्यावरण संवर्धन समितीने भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी राबविलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपण सर्वांनीदेखील पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. आपल्या शहरातील पर्यावरण समृद्ध राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महापौर नितीन काळजे यांनी दिली.

12 शाळांची निवड
पर्यावरण संवर्धन समितीने या उपक्रमासाठी 12 शाळांची निवड केली आहे. या सर्व शाळांच्या इमारतींवर जलपुनर्भरण यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 12 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा खर्च फिसर्व्ह इंडिया प्रा. लि. कंपनीच्या सीएसआर प्रकल्पातून केला जाणार आहे. या उपक्रमासाठी महापालिका आयुक्तांनी रिसतर परवानगी दिली आहे.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नितीन काळजे, नगरसेविका अश्‍विनी वाघमारे, नगरसेवक राहुल कलाटे, मयूर कलाटे, सहाय्यक आयुक्त मिनीनाथ दंडवते, शिक्षणाधिकारी ए. डी. कांबळे, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, मुख्याध्यापक बबन गव्हाणे, एस. शेलकंदे, पदवीधर शिक्षक संघाचे मनोज मराठे, हिरामण भुजबळ, प्रभाकर मेरूकर, अनिल दिवाकर, सुभाष चव्हाण, मीनाक्षी मेरूकर, रंजना कुदळे, सुनीता जुन्नरकर, संजीवनी मुळे, अनघा दिवाकर, दादासाहेब भूमकर, गोविंद चितोडकर आदींची उपस्थिती होती.