पिंपरी-चिंचवड : पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने 15 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘जलपुनर्भरण’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सायन्स पार्कच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी उपमहापौर शैलजा मोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका अनुराधा गोरखे, कर्नल (निवृत्त) शशिकांत दळवी, विकास पाटील, विनिता दाते, प्रभाकर मेरूकर, गोविंद चितोडकर, दत्तात्रेय कुमठेकर, गोरक्षनाथ सानप, अनिल दिवाकर, शिकंदर, घोडके, सुषमा पाटील, मीनाक्षी मेरूकर, अनघा दिवाकर, रंजना कुदळे, सुनीता जुन्नरकर उपस्थित होते. महापालिका संचलित सायन्स पार्क व पर्यावरण संवर्धन समितीच्या एकत्रित सहभागाने राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रमात सहभाग नोंदवून विशेष कार्य करणार्या नऊ शाळांचा या कार्यक्रमप्रसंगी सन्मान करण्यात आला.
कोण काय म्हणाले?
याप्रसंगी कर्नल (निवृत्त) शशिकांत दळवी यांनी उपस्थितांना जलपुनर्भरण प्रकल्पाची माहिती देऊन त्याचे फायदे सांगितले. तसेच, सर्वांनी आपल्या कुवतीप्रमाणे पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले पाहिजे, असे आवाहन केले. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या शाळांच्या इमारतींवर पर्यावरण संवर्धन समितीने स्व-खर्चातून जलपुनर्भरण यंत्र बसवून समाजासमोर चांगला आदर्श घालून दिला आहे, असे त्यांनी सांगितले. तर, उपमहापौर शैलजा मोरे यांनी सांगितले की, जलपुनर्भरण ही काळाची गरज आहे. शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालयासह प्रत्येक घरावर ही यंत्रणा बसविली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या शाळांचा झाला सन्मान
चिंचवडगाव विभाग : न्यू इंग्लिश स्कूल- चिंचवडगाव, एम.एस.एस. हायस्कूल- श्रीधरनगर, मनोरम प्राथमिक विद्यालय- चिंचवडगाव, मनपा कन्या शाळा- केशवनगर. यमुनानगर विभाग : मॉडर्न विद्यालय- यमुनानगर, पिंपरी-चिंचवड अपंग मित्र मंडळ- यमुनानगर, एस.पी.एम. मराठी प्राथमिक विद्यालय- यमुनानगर, शिवभूमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय- यमुनानगर. पिंपळे निलख विभाग : मनपा विद्यालय- पिंपळे निलख.
या सामाजिक संस्था व व्यक्तींचाही गौरव
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते वैभव घुगे, महापालिकेचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे, उद्यान विभाग अधिकारी प्रकाश गायकवाड, दत्तात्रेय गायकवाड, संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड, पदवीधर शिक्षक संघटनेचे मनोज मराठे, कर्नल (निवृत्त) शशिकांत दळवी यांचाही उत्कृष्ट सहयोगी म्हणून गौरव करण्यात आला.