पुणे । शहरातील पर्यावरण अहवालांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. या खास सभेला ठराविक काही लोकांनीच बोलावे, असे सत्ताधारी भाजपकडून विरोधकांना सांगण्यात आले. मात्र, सगळ्यांना बोलू द्या अथवा कोणीच बोलणार नाही, अशी भूमिका घेत विरोधकांनी सभेवर मूक बहिष्कार टाकला. भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले या सभेला उपस्थित असल्याने इतर वेळी मूक गिळून बसलेले भाजप नगरसेवक मात्र चांगलेच बोलते झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह अनेक अधिकारी गायब असल्याचे दिसून आले.
महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या पर्यावरण अहवालावर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. 11.30 वाजता ही सभा सुरू झाल्यानंतर सभागृहात फक्त अतिरिक्त आयुक्त शीतल उगले या एकमेव वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत्या. आयुक्त, उपायुक्त यांच्यासह आरोग्य विभाग, घनकचरा विभागातील आणि इतर विभागातील अधिकारी या सभेला अनुपस्थित होते.
अन् नगरसेवक लागले बोलू
भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. पत्रकार गॅलरीत बसून त्यांनी सदस्यांची भाषणे काळजीपूर्वक ऐकली. पत्रकार गॅलरीत शहराध्यक्ष आल्याबरोबर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी पर्यावरण विषयावर बोलण्यासाठी महापौरांकडे आपली नावे पाठविली. त्यामुळे काही क्षणात ही यादी लांबली. सभागृहात आपण गप्प बसत नाही. नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उठवतो हे शहराध्यक्षांना दाखविण्यासाठी कधीही न बोलणारे भाजपचे नगरसेवक बोलण्यासाठी उठले खरे मात्र अनेकजण विषय सोडून बोलत असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.
हे विरोधकांचे राजकारण
पर्यावरणावरील विशेष सभेचे नियोजन दोन महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. सर्वांना बोलण्याची संधी दिली जाणार होती. विरोधकांचा या विषयावर अभ्यास नसल्याने त्यांनी मूक बहिष्कार टाकला. गरज नसताना विरोधकांनी या विषयाचे राजकारण केले आहे, अशी टीका सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी केली आहे.
विरोधक बनले मूकदर्शक
पर्यावरण संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे या विषयास कोणाचाही विरोध नाही. त्यामुळे या विषयावर सर्वांना बोलू द्यावे, असे मत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्याकडे मांडले होते. हा विषय आजच मंजूर करायचा आहे, सर्वजण बोलले तर वेळ होईल. ’आमचे आठ तुमचे तीन आणि काँग्रेसचे दोन सदस्य बोलतील’ असे भिमाले यांनी तुपे यांना सांगितले. भिमाले यांचे मत अमान्य करत तुमच्याच लोकांना बोलू द्या, आम्ही कोणीच बोलणार नाही, अशी भूमिका तुपे यांनी घेतली. महापौर मुक्ता टिळक यांनी कामकाज सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे या विरोधकांतर्फे कोणीही या विषयावर बोलले नाही.
अधिकार्यांच्या गैरहजेरीवर आक्षेप
अधिकार्यांच्या अनुपस्थितीवर तीव्र आक्षेप घेत गोपाळ चिंतल यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. चिंतल यांनी तब्बल तासभर बॅटींग करत प्रशासनाला धारेवर धरले. अनुपस्थितीवर सदस्यांनी नाराजी दर्शविल्यानंतर काही अधिकारी धावत पळत सभागृहात पोहचले. चर्चेमध्ये भाजपच्या 30 ते 32 नगरसेवकांनी आपली मते व्यक्त करून सूचना केल्या. सभासदांनी मांडलेल्या मतांचा प्रशासनाने विचार करून आपल्या कामकाजामध्ये बदल करावा, अशी उपसूचना उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सभागृहात मांडली.