पलानीसामींची 18 फेब्रुवारी रोजी शक्तिपरीक्षा!

0

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर इडाप्पडी के. पलानीसामी यांना शनिवारी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. शनिवारी विधानपरिषदेत शक्तिपरीक्षण घेतले जाणार असून, त्यासाठी दिवसभर पलानीसामी यांची जोरदार धावाधाव दिसून आली. दरम्यान, पक्षाचे प्रेसिडिअम चेअरमन ई. मधुसुदनन यांनी व्ही. के. शशिकला यांच्यासह उपमहासचिव टी. टी. व्ही. दिनकरण व अन्य दोघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच, त्यांचे प्राथमिक सदस्यत्वदेखील रद्द करण्यात आले होते.

दोन महिन्यात तिसरे मुख्यमंत्री!

तामिळनाडू विधानसभेचे सचिव जमालुदीन यांनी सांगितले, की विधानसभेत 18 फेब्रुवारी रोजी विश्‍वासमत प्रस्तावावर मतदान घेतले जाईल. कालच पलानीसामी यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. तसेच, त्यांच्यासह 30 आमदारांनादेखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. पलानीसामी हे गेल्या दोन महिन्यातील तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाचेही वाटप केले असून, गृह, वित्त, लोकनिर्माण, राजमार्ग आणि छोटी बंदरे विकास ही महत्त्वाची खाती त्यांनी स्वतःकडे ठेवली आहेत. स्व. जयललिता आणि पन्नीरसेल्वम यांच्या कार्यकाळातही ही खाती स्वतः मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आलेली होती.

काँग्रेस, डीएमके विरोधात मतदान करणार!

शनिवारी सकाळी 11 वाजता पलानीसामी हे विश्‍वासमत दर्शक प्रस्तावाला सामोरे जाणार असून, डीएमके या प्रमुख विरोधी पक्षासह काँग्रेसने त्यांच्याविरोधात मतदान करण्याची भूमिका जाहीर केली आहे. तसेच, अन्ना द्रमुक पक्षाचे बहुतांश आमदार हे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या बाजूने असून, ते सभागृहात प्रत्यक्षात कुणाच्या पारड्यात मते टाकणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेेली आहे. काँग्रेसचे आठ तर डीएमकेचे 89 आमदार सभागृहात आहेत. दरम्यान, पन्नीरसेल्वम यांना सभागृह नेतेपदावरून हटविण्याची घोषणा शशिकला गटाने केली असून, विद्यमान शिक्षणमंत्री के. ए. सेनगोट्टीयन यांना सभागृह नेते बनविण्यात आले आहे.

पक्षात आता दोन सत्ताकेंद्र

पक्षाच्या महासचिव व्ही. के. शशिकला या तुरुंगात गेल्या असल्या तरी, त्यांचे भाचे टी. टी. टी. दिनकरन यांचे त्यांनी पक्षात पुनवर्सन केले आहे. त्यांना उपमहासचिव हे पद देण्यात आले असून, मुख्यमंत्रिपदी पलानीसामी यांची वर्णी लागली असली तरी खरी सत्ता हे दिनकरन हेच हाताळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात आता दोन सत्ता केंद्र निर्माण झाल्याचे प्राकर्षाने दिसून आले. शनिवारच्या शक्तिपरीक्षण हे पलानीसामीसह शशिकला यांच्या भाग्याचा फैसला करणारे ठरणार असून, त्यांना बहुमत सिद्ध करता येऊ नये, या साठी ओ. पन्नीरसेल्वम गटानेदेखील जोरदार कंबर कसली होती. स्व. जयललिता यांच्या स्वप्नांचा चुराडा आपण कुणालाही करू देणार नाही. अम्मांचा पक्ष शशिकला यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असे पन्नीरसेल्वम यांनी सांगितले. दरम्यान, तामिळनाडू जनतेची सहानुभूती मात्र पन्नीरसेल्वम यांच्या बाजूने असल्याचे सार्वत्रिक चित्र या राज्यात आहे.