चेन्नई : तामिळनाडूतील राजकीय सत्तासंघर्षाने शनिवारी लोकशाहीचा काळाकुट्ट इतिहास लिहिला. गुप्त मतदान घेण्याची विरोधी पक्षाची मागणी सभापतींनी फेटाळून लावल्यानंतर विधानसभेच्या सभागृहाचा अक्षरशः आखाडा झाला. डीएमकेच्या आमदारांनी पक्षपात करणार्या सभापती पी. धनपाल यांच्या आसनाकडे धाव घेत त्यांचे शर्ट फाडले तसेच त्यांना धक्काबुक्की केली. पोलिस व मार्शलने त्यांना सुखरुप बाहेर नेले. गोंधळामुळे दोनवेळा सभागृहाचे कामकाज थांबवावे लागेल तर गुप्त मतदान न घेण्याच्या भूमिकेवर सभापती ठाम राहिले. तिसर्यांदा डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्यासह त्यांच्या आमदारांना पोलिस व मार्शलने अक्षरशः उचलून सभागृहाबाहेर नेले. त्यानंतर सभापतींच्या निषेधार्थ काँग्रेस व मुस्लीम लीगच्या सदस्यांनी सभात्याग केला. सभागृहातील बहुमत अशाप्रकारे कमी झाल्यानंतर सभापतींनी विश्वासमत ठरावावर मतदान घेतले. त्यात मुख्यमंत्री ई. के. पलानीसामी यांच्या बाजूने 122 तर विरोधात 11 मते पडली. विरोधातील या मतांमध्ये प्रामुख्याने बंडखोर नेते ओ. पन्नीरसेल्वम, माजी शिक्षणमंत्री के. पंडियाराजन, आ. सेम्मालाई व आ. नटराजन यांचा समावेश होता. डीएमके, काँग्रेस व मुस्लीम लीगने पलानीसामी यांच्याविरोधात मतदानाची घोषणा केली होती. तसेच, गुप्त मतदान घेण्याची मागणी केली होती. तसे झाले असते तर पलानीसामी यांना बहुमत सिद्ध करता आले नसते. परंतु, सभापतींनी पक्षपात करत, पलानीसामींना फायदा पोहोचविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याविरोधात विरोधी पक्षनेते स्टॅलिन यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली असून, रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. बहुमत सिद्ध केल्यानंतर पलानीसामी यांनी स्व. जयललिता यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. तर आपल्याला आता लोकांच्या न्यायालयातच न्याय मिळेल, असे सांगून आपण अम्मांचे (स्व. जयललिता) यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे ओ. पन्नीरसेल्वम यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. सभागृहात पक्षपात केला गेला असा आरोपही त्यांनी केला.
सभागृहात गोंधळ, मारहाण, तोडफोड!
ई. के. पलानीसामी यांची शशिकला यांनी आमदारांच्या गटनेतेपदी निवड केली होती. याचाच अर्थ आता एआयएडीएमके पक्षावर व मंत्रिमंडळावर तुरुंगात असूनही शशिकला यांचा दबदबा राहणार आहे. तामिळनाडूच्या विधानसभेला शनिवारी दिवसभर कुस्तीच्या आखाड्याचे स्वरूप आले होते. डीएमकेच्या आमदारांनी सभागृहात गुप्त मतदानाची मागणी केली. ती सभापती पी. धनपाल यांनी फेटाळून लावली. त्यामुळे डीएमकेचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले. ओ. पन्नीरसेल्वम यांनीही गुप्त चिठ्ठीद्वारे मतदान घेण्याची मागणी केली, तीही फेटाळण्यात आली. त्यामुळे उघड मतदानावरून गोंधळाला सुरुवात झाली. डीएमकेच्या आमदारांनी सभापती धनपाल यांच्याबरोबर झटापट केली. माईक आणि टेबलांची तोडफोड केली. यानंतर सभापतींना मार्शल आणि पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले. झटापटीत त्यांचा शर्टदेखील फाटला. त्यानंतर विधानसभेला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. अशा प्रकारे विधानसभेत पोलिसांना बोलाविण्याची तीस वर्षातील ही पहिलीच घटना होती. या प्रचंड गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी एकपर्यंत, पुन्हा तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू केल्यानंतर पुन्हा जोरदार गोंधळ सुरू झाला. यानंतर स्टॅलिन यांच्यासह डीएमकेच्या आमदारांना पोलिसांनी अक्षरशः उचलबांगडी करून सभागृहाबाहेर काढले. स्टॅलिन यांना मारहाणही करण्यात आली. स्टॅलिन हे फाटलेल्या शर्टसह बाहेर आले व प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना विधानसभा सभापतींनी मनमानी करून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केला.
सभापतींनी घेतले अगदी उघड मतदान!
सभापतींनी पलानीसामी यांना पुरेपूर फायदा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मतविभाजनाचा पर्याय वापरला. सभागृहाचे सहा भागात विभाजन करण्यात आले. तीन वेळा घंटा वाजविण्यात आल्यानंतर विधिमंडळ सचिव ए. एम. पी. जमालुद्दीन यांनी प्रत्येक गटाला बोलावून त्यांची मते जाणून घेतली. ज्यांचे सरकारला समर्थन आहे त्यांची मते पहिल्यांदा नोंदवून घेतली तर नंतर ज्यांचे सरकारला समर्थन नाही त्यांची मते नोंदवून घेतली. उघड पद्धतीने मतदान घेण्यात आल्याने रिसॉर्टमध्ये ओलिस ठेवण्यात आलेल्या सर्व आमदारांनी पलानीसामी यांच्या बाजूने मतदान केले. तर डीएमकेच्या 89 आमदारांना पोलिस व मार्शलने सभागृहाबाहेर हाकलले होते. सभापतींच्या मनमानी निषेधार्थ काँग्रेस व मुस्लीम लीगच्या सदस्यांनी सभात्याग केला होता. ओ. पन्नीरसेल्वम यांच्यासह 11 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले होते.
पक्षीय बलाबल
234 : एकूण आमदार
134 : अण्णा द्रमुक
89 : द्रमुक
08 : काँग्रेस
01 : मुस्लीम लीग
01 : रिक्त