पलानीसामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

0

चेन्नई : मागील काही दिवसांपासून तामिळनाडूत सुरू असलेली राजकीय गरमागरमी गुरूवारी शांत झाली. राज्यपाल के विद्यासागर राव यांनी शशिकला यांच्या गटातील पलानीसामी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. यानंतर पलानीसामी यांनी 30 मंत्र्यांसह सायंकाळी मुख्ममंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी बहुमत सिध्द करण्यासाठी पलानीसामी यांना पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. डिसेंबरमध्ये जयललिता यांच्या निधनानंतर ओ पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री झाले होते. यानंतर शशिकला यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पन्नीरसेल्वम यांनी राजीनामा दिल्यानंतर बंडाचा झेंडा फडकावला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी शशिकला यांना कारागृहात जावे लागले होते. तत्पुर्वी शशिकलांनी पलानीसामी यांना विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली होती. अशा वेगवान हालचालींना तापलेले तामिळनाडूचे राजकारण गुरूवारी पलानीसामींच्या शपथविधीनंतर काही प्रमाणात शांत झाल्याचे दिसत आहे.

30 मंत्र्यांनी घेतली शपथ

गुरूवारी राज्यपालांनी पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम यांना त्यांच्या समर्थक आमदारांची यादी देण्यास सांगीतले. त्यानंतर दोघांनीही राज्यपालांची सकाळी साडेअकरा वाजता भेट घेतली. पन्नीरसेल्वम यांच्याकडे आमदारांचे संख्याबळ जास्त नसल्याने पलानीसामी यांना सरकार स्थापन करण्यास सांगण्यात आले. पलानीसामी यांनी 124 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा केला होता. तत्पुर्वी 30 मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली होती. गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजता झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात पलानीसामी यांच्यासह 30 मंत्र्यांनी शपथ घेतली.

विधासभेतील सध्याची स्थिती

तामिळनाडू विधानसेत एकुण 234 आमदार आहेत. एमआयएमडीएमकेकडे 135 तर डीएमकेकडे 89 आमदार आहेत. जयललिता यांच्या निधनामुळे त्यांची जागा रिक्त आहे. काँग्रेसकडे 8 आणि मुस्लिम लीगकडे एक आमदार आहे. शशिकला यांनी 119 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा केला होता. तर पलानीसामी यांनी 124 आमदार पाठीशी असल्याचा दावा केला आहे. तर पन्नीरसेल्वम यांच्याकडे केवळ 11 आमदार आहेत. त्यामुळे पन्नीरसेल्वम मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून बाहेर पडले. मात्र, पलानीसामींना पंधरा दिवसात बहुमत सिध्द करावे लागणार असल्याने त्यावेळी पन्नीरसेल्वम नवी चाल खेळून त्यांना अडचणीत आणू शकतात. राज्य सरकार टीकविण्यासाठी कमीतकमी 118 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे.

शशिकलांच्या मागण्या फेटाळल्या

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी चार वर्षांची शिक्षा झाल्याने शशिकला नटराजन यांची बुधवारी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शशिकला यांनी कारागृहात ए क्लास सेल मागीतला होता. परंतू सध्या त्यांना इतर दोन कैद्यांबरोबर ठेवण्यात आले आहे. त्यांचा कैदी नंबर 9234 आहे. शशिकला यांनी मेणबत्ती बनविण्याचे काम देण्यात आले आहे. या कामाचा त्यांना पन्नास रूपये मोबदला मिळणार आहे. आणखी सुविधा देण्याची मागणी शशिकला यांनी केली होती. मात्र त्या मागण्या जेल प्रशासनाने फेटाळल्या आहेत. दरम्यान पनीरसेल्वम यांनी शशिकला यांना पक्षाच्या महासचिव केल्याच्याविरोधात तक्रार केली आहे.