पळसदरी-खोपोली राज्यमार्गाची सखोल चौकशी झालीच पाहिजे

0

कर्जत । कर्जत तालुक्यामधून पळसदरी मार्गे खोपोलीला जाणारा राज्यमार्ग सन 2014-15 मध्ये नागरिकांसाठी सुस्थितीत झाल्यानंतर प्रवासासाठी खुला करण्यात आला. मात्र शासनाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दरवर्षी या राज्य मार्गावरील खड्डे भरण्याचे काम केले जात आहे. शासनाची करोडो रुपयांची लुट या राज्य मार्गाच्या माध्यमातून शासकीय अधिकारी आणि ठेकेदार करीत आहेत. या राज्यमार्गाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आपण करणार असल्याचे साटम यांनी सांगितले. गेली तीन वर्ष या राज्य मार्गावरुन प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पळसदरी ग्राम पंचायत हद्दीतील नांगुर्ले, तिघर, वरणे, पळसदरी, तळवली येथील अनेक ग्रामस्थांनी माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन शनिवारी या मार्गावरील खड्डे भरण्याचे तात्काळ बंद केले. कारण, पळसदरी-खोपोली राज्यमार्ग म्हणजे ठेकेदारांचे करोडो रुपये कमावण्याचे साधन झाले आहे. त्याप्रसंगी माजी आमदार देवेंद्र साटम यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे चेअरमन यांना पत्र देऊन या राज्य मार्गाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेरांवर कठोर कारवाई व्हावी अशी चर्चा येत्या दोन दिवसांत करणार असल्याचे साटम यांनी सांगितले.

परीसरातील ग्रामस्थ आले एकत्र
पळसदरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी पळसदरी-खोपोली राज्यमार्ग हा प्रवासासाठी जीवघेणा ठरत आहे. आम्हाला या मार्गाचे नुसते खड्डे भरल्याने समाधान होणार नाही. तर, या राज्यमार्गाच्या कामाची चौकशी व्हावी आणि मग चांगल्या दर्जाचा मार्ग प्रवासासाठी व्हावा म्हणून ग्रामस्थ एकत्र आले. याप्रसंगी देवेंद्र साटम यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, 2014-17 पर्यंत या मार्गाची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी अधिकार्‍यांना दुरध्वनीद्वारे संपर्क केल्यानंतर शनिवारी लगेच खडी टाकून खड्डे भरण्याचे काम सुरू केले. त्यामुळे या मार्गाचे उत्तम दर्जाचे काम अजूनपर्यंत का केले गेले नाही असा सवाल सर्व सामान्य नागरिकांमध्ये उपस्थितीत होत आहे. या राज्यमार्गाच्या कामात काही त्रुटी असल्यास सक्षम अनुभवी अधिकार्‍यांच्या माध्यमातून हा रस्ता चांगल्या प्रकारे व्हावा अशी मागणी आम्ही करणार असल्याचे साटम यांनी जाहीर केले.