पळसदरी रेल्वेस्थानकाला लागलेय समस्यांचे ग्रहण

0

प्रवाशांचे हाल, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

कर्जत । मागील काही वर्षांत रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वेस्थानकांवर करोडो रुपये खर्च करून स्मार्ट रेल्वेस्थानक बनवण्याची मोहीमच हाती घेतली होती. त्यानुसार अनेक रेल्वेस्थानकांचे रुपडेही बदलले. मात्र, याला अपवाद ठरले ते कर्जत-खोपोली मध्य रेल्वे मार्गावरील पळसदरी रेल्वेस्थानक. कर्जत पासून खोपोलीकडे जाणारे पळसदरी हे पहिलेच रेल्वेस्थानक आहे. पळसदरी येथे रेल्वेचे मोठे पळसदरी धरण आहे तसेच येथे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. राज्यभरातून येथे भाविक दर्शनासाठी तसेच डॅमवर पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे या रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा गरजेच्या आहेत. असे असूनही येथे या मूलभूत सुविधांची वानवा आहे. यामध्ये प्रमुख म्हणजे येथील प्रसाधनगृह बंद असून त्याला चारही बाजूने जंगली झाडाझुडपांनी वेढल्याने ते या गवतात जवळ जवळ गायबच झाले आहे. ना सांडपाण्याची सोय ना पिण्याच्या पाण्याची सोय.

जर एकीकडे रेल्वे प्रशासन रेल्वेस्थानक स्मार्ट करुन प्रवाशांना जास्तीत जास्त सोईसुविधा देण्याचा प्रयत्न करत असताना पळसदरी रेल्वेस्थानकाकडे अक्षम्य दुर्लक्ष का? या रेल्वेस्थानकातील प्रवाशांना अनेक गैरसोईंचा सामना करावा लागत असल्याने त्या समस्या त्वरित दूर कराव्यात. -मयूर मोरे (रेल्वे प्रवासी)

फलाटावरील पत्र्यांची शेडही अर्धवट स्थितीत
प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही (बाकडे) नसल्याने रेल्वे फलाटावर दोन्ही बाजूला मोठे दगड रचून त्या दगडांवर आडवा रेल्वे रुळाचा तुकडा ठेवून त्यावर नाईलाजाने प्रवांशाना बसावे लागत आहे. फलाटावरील पत्र्यांची शेडही अर्धवट स्थितीत असल्याने ऊनपावसात प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. फलाटावरील काही भागातील फरशा उचकटल्या असल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे गाडी पकडताना प्रवाशांचा अपघात होण्याची शक्यता आहे. गाडीच्या वेळा समजण्यासाठी असणारे इंडिकेटर तसेच घड्याळही नाही. गाडीची कोणतीही पूर्वसूचना या रेल्वेस्थानकात देण्यात येत नसल्याने नवीन प्रवाशांचा गोंधळ उडतो. रेल्वे फलाट तसेच रुळालगतही कंबरभर उंचीचे गवत वाढल्याने विषारी प्राण्यांचा मुक्तसंचारही आहे.