पळसदेव उजणी धरण परीसरातील हेमाडपंथी मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर

0

इंदापूर (सुधाकर बोराटे)। संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी जीवनदायणी ठरलेले धरणातील पाणी फुगवटा धरल्यानंतर पुर्नवसन झालेल्या पळसदेव गावच्या वैभवात भर घालणारे प्राचीन हेमाडपंथी दगडी मंदिराची दुरावस्था झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. दरवर्षी उजनी धरण पुर्ण पाण्याने भरल्यानंतर पाण्याखाली जाणारे हे मंदिर उन्हाळ्यात धरणातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर पूर्णपणे उघडे पडते. या मंदिराच्या दगडांवर विविध प्रकारची शिल्पे साकारण्यात आलेली असल्याने मंदिर आकर्षित वाटत आहे. रामायमाची माहिती सांगणारी ही शिल्पे असल्याने, पुरातन काळातील हा दुर्मिळ ठेवा जतन करण्याची गरज असल्याचे जाणकारांतून बोलले जात आहे.

इंदापूर तालुक्यातील भिमा नदीच्या तीरावर वसलेल्या पळसदेव गावाचे सन 1976 मध्ये उजनी धरणामुळे पुर्नवसन झाले. नदीच्या काठावरील या गावचा प्रमुख व्यवसाय हा शेती होता. धरण बांधणीनंतर या ग्रामस्थांचे गावालगतच्या टेकडीवर पुर्नवसन करण्यात आले. पुर्नवसन झाले खरे, मात्र ग्रामस्थांनी आपल्या जमिनी, घरे, मंदिरे आहे त्या स्थितीत सोडून दिले. केवळ ग्रामदैवत पळसनाथाच्या मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. जुन्या मंदिरातील महादेवाची पिंड नवीन मंदिरात स्थापन करण्यात आली. तर हे जुने दगडी मंदिर मात्र आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आले. गेली साडेतीन दशकांचा कालावधी उलटला तरी मंदिराने आपले अस्तित्व टिकवले आहे.

पुरातत्व विभागाची डोळेझाक
काही ठिकाणी मंदिराची पडझड झाली आहे. अनेक दुर्मिळ शिल्पे खाली पडलेली आहेत. काही शिल्पांचे तुकडे झाले आहेत. तुकडे झालेले शिल्प कोरीव (दगड) येथील नागरीक घरे बांधण्यासाठी भरुन नेताना दिसत होते. प्राचीन काळातील स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचा दाखला देणार्‍या या मंदिराचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घेवून ग्रामस्थांच्या माध्यमातून हा प्राचीन वारसा जपण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. पुरातत्व विभाग जाणिवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे बोलले जात असुन या मंदीराच्या बाहेरील बाजुस अनेक अवशेष पडलेले असुन त्याचे पुरातत्व विभागाकडून जतन होणे. गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.