जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
जामनेर : तालुक्यातील पळासखेडा येथील अनिल कडू खंडारे या तरुणाला वादावरुन मारहाण करुन 6 नोव्हेंबर 2012 रोजी विहिरीत फेकून दिले होते. याप्रकरणी जामनेर पोलिसात दाखल खूनाच्या गुन्ह्यात पाच जणांना जन्मठेपेची शिक्षाा सुनावली. न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयान हा गुरुवारी हा निकाल दिला. आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे व सुनील मधुकर लोखंडे (सर्व रा.पळासखेडा गुजराचे ता.जामनेर) अशी संशयितांची नावे आहेत.
तालुक्यातील पळासखेडा गुजराचे येथील अनिल खंडू खंडारे यांचे कुटुंब मेहनत करुन आपला उदरनिर्वाह करीत होते. 6 नोव्हेंबर 2012 रोजी सायंकाळी सात वाजता आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे व सुनील मधुकर लोखंडे या पाच जणांनी अनिल खंडारे याला बेदम मारहाण केली होती. यावेळी पत्नी सुनीता हिने धाव घेऊन पतीची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता. मला लहान मुले आहेत, पतीला मारु नका अशी विनंती करीत असतानाही या पाच जणांनी अनिल याला मार सुरुच ठेवला होता. यावेळी अनिल याचा भाऊ व वहिणी यांनीही आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी दयामया न दाखविता अनिल याला जखमी अवस्थेत जामनेर रस्त्यावरील एका विहिरीत फेकून दिले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पत्नी सुनीता खंडारे यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलीस स्टेशनला पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारच ठरले पुरावे
तपासाधिकारी व्ही.आर.शित्रे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गुन्हा सिध्द करण्यासाठी मृत अनिल याची पत्नी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुनीता खंडारे, भाऊ वसंत कडू खंडारे, वहिणी लताबाई सुनील खंडारे याशिवाय डॉ.रवींद्र कडू पाटील, तपासाधिकारी व्ही.आर.शित्रे व अशोक उतेकर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. शवविच्छेदन अहवाल पुरावा ठरला.
अशी आहे शिक्षा व दंड
सर्व आरोपींना 302 सह 149 नुसार दोषी धरुन जन्मठेप, प्रत्येकी 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसाचा साधा कारावास व 147 अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास, प्रत्येकी 200 रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास, 323 अन्वये सहा महिने कारावास व प्रत्येकी 100 रुपये दंड, दंड भरल्यास सात दिवस कैदेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड.निलेश दयाराम चौधरी यांनी कामकाज पाहिले. अॅड.एस.जी.काबरा यांनी काही आरापींची सरतपासणी घेतली होती. पैरवी अधिकारी म्हणून शालीग्राम पाटील यांनी सहकार्य केले. बचावपक्षातर्फे अॅड.कृष्णा बनकर यांनी काम पाहिले.
शिक्षा सुनावताच आरोपींना रडू कोसळले
सर्व आरोपींना शिक्षा सुनावातच रडू कोसळले. परिवारातील महिलाही रडत होत्या. सर्व आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, सर्व आरोपी जामीनावर बाहेर होते.