बोदवड। येथून जवळच असलेल्या पळासखेडा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विविध समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत असून जिल्हा परिषद सदस्य व सरपंचांनी अचानक जावून पाहणी केली असता विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आढळून आले आहे.
पाहणी पथकात यांचा होता समावेश
जिल्हा परिषद सदस्य वर्षा पाटील, पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड, सरपंच इंदुबाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास पाटील, प्रताप चव्हाण, पवन पारधी यांनी पळासखेडा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत जावून विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सोयीसुविधा व भोजनाची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता असे आढळून आले आले की, विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेले भोजन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे.
भोजनात दिलेले खिचडी खराब व कवचट असल्याने ती न खाल्ल्याने आवाराबाहेर फेकल्याने मुलांना उपाशी झोपावे लागले. भोजनासाठी करण्यात येणार्या पोळ्यासुध्दा तपासल्या असता जळालेल्या खाण्यास अयोग्य दिसल्या. यावरुन आश्रमशाळेत जेवणाचा दर्जा हा निकृष्ठ असल्याचे उघडकीस आले आहे.
खासदार खडसेंना तक्रार
शासन आश्रमशाळेवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करते परंतु विद्यार्थ्यांना निकृष्ठ भोजन देवून त्यांना एकप्रकारे कुपोषित करीत असल्याचा प्रकारही उघडकीस येत आहे. याबाबत या आश्रमशाळेवर कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली करण्यात आली आहे.