बोदवड । रेशनच्या धान्य वाटपातील काळा बाजार, भ्रष्टाचार होवू नये तसेच प्रत्येक रेशन कार्डधारकाला त्याच्या नावाचा दुरुपयोग होवू नये, बनावट रेशनकार्डचा वापर, रेशन कार्डवरील युनिट आणि धान्याची किंमत यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ई-पॉस प्रणालीचा वापर रेशन दुकानदार सुमाबाई सुरवाडे यांच्याकडून त्यांच्या प्रती ई पॉस प्रणालीचा वापर करुन रेशन धान्य वाटप करण्यात आले.
धान्य वाटपात येणार पारदर्शकता
ई-पॉस प्रणालीद्वारे ज्या व्यक्तिच्या नावे रेशनकार्ड आहे त्याच व्यक्तिला प्रत्यक्ष अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळणार नाही किंवा ज्या व्यक्तिचे नाव रेशन कार्डामध्ये समाविष्ट आहे, आधार लिंक आहे त्यांनाच रेशनवरील धान्य मिळणार आहे. परंतु जी व्यक्ती बाहेरगावी असेल अशा रेशनकार्डधारकाला धान्य घेण्यासाठी स्वतः अंगठा द्यावा लागणार आहे. या ई-पॉस पध्दतीमुळे धान्य वाटपात पारदर्शकता राहणार आहे. धान्य वाटपातील गैरप्रकाराला आळा बसेल. परंतु गावातील दक्षता समितीची सभा नियमित होणे गरजे आहे. तसेच दक्षता समितीच्या सदस्यांना एसएमएसद्वारे सुध्दा धान्याची माहिती देण्यात यावी. ज्याप्रमाणे ई पॉस पध्दत धान्य वाटपासाठी लागू केली त्याच पध्दतीने केरोसिन वाटपासाठी सुध्दा केली पाहिजे. कारण रॉकेल वाटपात सुध्दा मोठा भ्रष्टाचार केला जातो. बोदवड तालुक्यात 20 रुपये लिटरप्रमाणे रॉकेल मिळते. कॅश मेमो मिळत नाही. युनिटप्रमाणे रॉकेल दिले जात नाही. रेशन दुकानदारांनाच का ई पॉस पध्दतीची सक्ती, रॉकेल परवाना धारकांना सुध्दा ई पॉस मशिन देण्यात यावी. रॉकेल वाटपातील भ्रष्टाचाराला सुध्दा आळा बसेल, अशी जनतेची मागणी आहे.