पवईत बाईकस्वारांनी महिलेची सोन्याची चेन पळवली

0

मुंबई : रस्त्यावर चालत असताना दिवसाढवळ्या एका महिलेची बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सोन्याची चेन खेचून पळवल्याची घटना पवईत आज घडली. मीना पंडागळे असे या महिलेचे नाव असून, मीना या पवईच्या गरीबनगरमध्ये राहतात. सकाळी कामावरून सहकारी महिलांसोबत घरी परतत असताना, हिरानंदानी हॉस्पिटल जवळच्या हॉटेल गोल्ड कॉइन येथे बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी मीना यांच्या गळ्यातील रुपये 57 हजार किंमतीच्या दोन सोन्याच्या चैनी खेचून पळ काढला, काही कळण्याच्या आतच त्यांनी तेथून पोबारा केल्याने बाईकचा नंबर कळू शकला नसल्याचे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले.

याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भा.द.वि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला असून, आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पोलीस उप-निरीक्षक प्रियांका पाटील यांनी यावेळी ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले. जवळच्या सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले असता, त्यांचे चेहरे अस्पष्ट येत असल्याने ओळख अद्यापही पटू शकलेली नाही, त्यामुळे येथे लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही यंत्रणेच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अश्याप्रकारे दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंग च्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.