पिंपरी-चिंचवड : महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आयोजित पवनाथडी जत्रेतील 400 स्टॉलसाठी 984 अर्ज आल्याची माहिती नागरवस्ती विभागाचे अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली. महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत 4 ते 8 जानेवारीदरम्यान सांगवीतील पी.डब्लू.डी.मैदान येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी दि. 15 डिसेंबरपर्यंत अर्ज मागवीले होते. त्यानुसार महापालिकेकडे 984 बचतगटांनी अर्ज केले आहेत. त्यातून पात्र बचतगटांना त्यांचे स्टॉल पवनाथडी जत्रेत लावता येणार आहेत. सुरुवातील महापालिकेने दि. 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत दिली होती. परंतु, अनेक महिला अर्ज करु न शकल्याने मुदतवाढ देण्याची मागणी उपमहापौर शैलजा मोरे यांनी केली होती. त्यानंतर पालिकेने अर्ज करण्यास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.