पिंपरी-चिंचवड : पवनाथडी जत्रा कायमस्वरुपी बंद करून महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिला बचत गटांसाठी मॉल उभारून त्यांना आर्थिक सक्षम बनवावे. कारण पवनाथडीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून बचत गटांचा आर्थिक फायदा न होता काही संस्था प्रमुखांचाच फायदा होत आहे, असे निवेदन काँग्रेसच्या चिंचवड ब्लॉक समितीचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी आयुक्तांकडे दिले आहे.
कोट्यवधीचा खर्च पाण्यात
निवेदनात म्हटले आहे, की महापालिका गेली दहा ते बारा वर्षे महिला बचत गटांना अनुदान देते, पण बांगला देशासारख्या बचत गटांची प्रगती आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात का झाली नाही? गेले आठ ते दहा वर्षात पवनाथडी जत्रेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम दाखवून महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी करीत आहेत. हाच पैसा आपण बचत गटांना उद्योग व्यवसायासाठी नवीन प्रॉडक्ट बन विण्यासाठी दिला तर त्याचा फायदा महिला बचत गटांना होऊ शकतो. आत्तापर्यंत पवनाथडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, ते सर्व पाण्यात गेले आहेत.
निवडणुकांमध्ये बचत गटांना फायदा
पवनाथडी उपक्रम बंद करावा अशी मागणी चार-पाच वर्षांपूर्वीपासून चिंचवड ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करीत आहोत. पवनाथडी या उपक्रमामध्ये बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजार पेठ मिळावी असा उद्देश महापालिकेचा होता. तसेच बचत गटातील महिला सभासद आर्थिक प्रगती झाली पाहिजे असा चांगला हेतूही त्यामध्ये होता. मात्र, गेल्या 11 वर्षात बचत गटांचा आ र्थिक फायदा न होता तो काही संस्था प्रमुखांचा फायदा होत आहे. त्यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक प्रगती साधता आली नाही. महापालिकेच्या निवडणूका लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बचत गटांना त्यावेळी आर्थिक रसद दिली जाते. तोच फायदा बचत गटांना होत असतो.
प्रभागवार खास मॉल उभारावेत
यापुढे पवनाथडीवरील खर्च प्रभागवार किंवा विभागवार मोठे मोठे मॉल उभारून महिला बचत गटांना महापालिकेने बचत गटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. तर त्याचा फायदा महिला बचत गटातील सर्व सभासदांना होऊ शकतो. महिलांच्या केलेल्या उत्पादनाकडे ग्राहक खेचले जात नाही कारण सांस्कृतिक कार्यक्रमामुळे महिला बचत गटाने केलेले उत्पादन खपले जाऊ शकत नाही. म्हणून महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिला बचत गटासाठी मॉल उभारून महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.