पवनानगर फाट्यावरील वाहतूक कोलमडली

0

कामशेत (प्रतिनिधी) – जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाट्यावर उड्डाणपुलाच्या कामाची अंतिम मुदत जवळ येताच निर्माण कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजनांचा मोठा अभाव असल्याची तसेच स्थानिक वाहतुकीला पर्यायी वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याचा या भागातील व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पवनानगर येथील व्यापार्‍यांच्या वतीने कामशेत पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सरपंच तानाजी दाभाडे, संतोष राक्षे, इंदरमल परमार, साई बालगुडे, नवनाथ लालगुडे, किरण दीक्षित, बंटी मोदी, किरण प्रजापत, सुनील मुनोत, राजू अगरवाल, दिनेश गुप्ता, व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.

पवना नगर फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असून त्यासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे. मात्र या वाहतुकीत स्थानिक वाहतुकीसाठी काहीच प्राधान्य दिले नसल्याने स्थानिक नागरिक, पादचारी व वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात पवनानगर फाटा येथे कामशेतमधून जाणारा रस्ता सेवा रस्त्याच्या अलीकडे बंद केल्याने वाहन चालकांची मोठी कोंडी झाली आहे. महामार्गाच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांना मोठा वळसा मारावा लागत आहे.

व्यावसायिकांचे नुकसान
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पवना नगरकडे जाणारा रस्ता महामार्गाच्या अलीकडे अडवल्याने या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापारी व दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हा रस्ता बंद केल्याने महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनी, पंचशील कॉलनी, दौंडे कॉलनी, येवले वाडी, कुसगाव व पवना नगर रस्त्यावर असलेली गावे आदी भागातून येणार्‍या नागरिकांचा रस्ता बंद झाल्याने याचा परिणाम येथील व्यावसायिकांवर झाला आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी चार महिने लागणार आहेत. जर हा रस्ता असाच चार महिने बंद ठेवला तर ऐन लग्नसराईच्या हंगामात येथील व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. रस्ता बंद असल्याने नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या रस्त्यावरील एकेरी वाहतूक सुरू करावी. तसेच या भागात एका पोलिस कर्मचार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.