जलपर्णीमुक्ततेसाठी श्रमदानाचा शंभरावा दिवस
पिंपरी-चिंचवड : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई – उगम ते संगम’ या अभियानाला रविवारी शंभर दिवस पूर्ण झाले. दरम्यान, विदेशातून कौतुक व आर्थिक मदत होत आहे. नोकरीनिमित्त कतार (युएई) येथे असलेल्या सुनील कवडे यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी देखील पत्राद्वारे मांडल्या आहेत. तसेच या अभियानाला मदत म्हणून त्यांनी पंधरा हजार रुपयांचा धनादेश दिला. रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे सदस्य रो. बाळकृष्ण खंडागळे यांनी देखील या अभियानासाठी पाच हजार रुपयांची मदत केली.
येत्या रविवारी रावेत येथे श्रमदान
शंभराव्या दिवशी पाच ट्रक जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात आली. दररोज चालणारे हे जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान पुढील रविवारी (दि. 18) रावेत बंधारा येथे होणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी दिली. अभियानाचा शंभरावा दिवस किर्लोस्कर उद्योग समुहाच्या गौरी किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी प्रत्यक्षात जलपर्णी काढून या अभियानात आपले योगदान दिले. यावेळी मागील शंभर दिवसांचा प्रवास, या दिवसांमध्ये करण्यात आलेले काम, नदी स्वच्छतेसाठी करण्यात आलेले उपाय, उगम ते संगम अभियान याविषयी तसेच भविष्यात करण्यात येणार्या तात्पुरत्या व कायमस्वरूपी योजनांविषयी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर आणि हेमंत गवंडे यांनी विस्तृतपणे माहिती सांगितली.
सामाजिक संस्थांचा सहभाग
या उपक्रमात भावसार व्हिजनचे राजीव भावसार, जेएसपीएम संस्थेचे हंबर, रानजाई प्रकल्पाचे आबा मसुगडे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे सोमनाथ हरपुडे, मारुती उतेकर, सुनील कवडे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, गणेश बोरा, हेमंत गवंडे व पी.सी.सी.एफ., सावरकर मित्र मंडळ, संस्कार प्रतिष्ठान, पोलीस नागरीक मित्र मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या महिला आदी निसर्गप्रेमी व सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.
विविध प्रात्यक्षिकांमधून पर्यावरण
प्रसाद सिद्दकी यांनी शेणापासून बनविलेल्या कुंड्या दाखवून त्याबद्दल माहिती दिली. प्लास्टिक कुंडी वापरापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती केली. धनंजय शेडबाळे यांनी कॅरिबॅग वापर टाळण्यासाठी उपस्थित महिलांना गौरी किर्लोस्कर यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. हेमंत गवंडे यांनी सुपारी पानापासून बनविलेल्या प्लेट्स वापरासंबंधी माहिती देऊन थर्माकॉल आणि प्लास्टिक प्लेट्स वापरण्यासंबंधी जनजागृती केली.