पिंपरी-चिंचवड : पवनामाईतील जलपर्णी काढण्यासाठी शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असून आज (रविवारी) वाल्हेकरवाडी घाटावर सर्वांच्या सहभागातून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली.यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन,जलमैत्री अभियान भावसार व्हिजन इंडिया, आणि पीसीसीएफ या संस्था, स्थानिक नगरसेवक, व नागरिकांनी सहभाग घेतला होता. गणेश विसर्जनानंतरच पवना नदीची स्थिती पाहून एक पाऊल गणरायासाठी एक पाऊल पवनामाईसाठी या मिशनची आखणी करण्यात आली.
दोरीने जलपर्णी ओढली
पहिल्या टप्प्यात रावेत बास्टेक ब्रीज ते वाल्हेकरवाडी घाट या 700 मीटर अंतराचे नदीपात्र स्वच्छ करण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी सकाळी साडेआठपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यासाठी आधीच रावेत ब्रीज जवळ व वाल्हेकरवाडी घाटाजवळ नायलॉनची दोरी पात्रात बांधण्यात आली होती. त्यामुळे दोरीला जलपर्णी अडकली. जलपर्णीचे बीज उगवण्यास व पसरण्यास नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सुरुवात होते. त्या आधीच दोरी लावून जलपर्णी काढण्यात आली.त्यामुळे पुढे नदी पात्रात जलपर्णी वाढणार नाही. त्यातूनच आज दोरीला अडकलेली जलपर्णी व कचरा काढण्यात आला. यामध्ये सुमारे पाच ते सहा मोठे टेम्पो कचरा व जलपर्णी नदीपात्रातून काढण्यात आली.
सलग चार रविवारी मोहिम
या मोहिमेनुसार वाल्हेकरवाडी ते दापोडी या परिसरातील नदीपात्रातून ही स्वच्छता मोहीम पुढील सलग चार रविवारी राबविली जाणार आहे. तसेच नदी पात्रात येणार्या नाल्यामध्ये तुर्तास कच्चा पूल बांधून साठलेल्या पाण्याची स्वच्छता करुन ते पाणी पुन्हा नदीमध्ये सोडण्यासाठीही एक प्रयोग केला जाणार आहे. ज्यामध्ये सुमारे 50 ते 60 हजार लीटर पाणी दररोज स्वच्छ होणार आहे, अशी माहिती पीसीसीएफचे गणेश बोरा यांनी दिली.
नागरिकांना आवाहन
पुढच्या वर्षीच्या गणेश विसर्जनापर्यंत घाट व नदी पात्र स्वच्छ असले पाहिजे या हेतूने ही मोहीम राबवली जात असून यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात केली गेली आहे. याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला असून पुढील मोहिमेमध्ये इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.